महाराष्ट्र अव्वल: जिओ टीव्हीवर ४ भाषांमध्ये १२ चॅनेल्सवर मिळणार ऑनलाईन शिक्षण

0

मुंबई: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरु करणे अडचणीचे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षण वर्गासाठी शिक्षण विभागाकडून काही मागर्दर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यावरून शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारची तयारी नसल्याचे दिसते. दरम्यान आता जिओ टीव्हीवर इयत्ता 3 री ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 12 चॅनेल्स सुरू केल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटवरून याची माहिती दिली आहे. 4 माध्यमांमध्ये चॅनेल्स सुरू करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दीड महिन्यांपूर्वीच रिलायन्स जिओसोबत ऑनलाईन शिक्षणासाठी करार केला आहे. त्यानुसार, रिलायन्स जिओ टीव्हीवर 12 चॅनेल्स सुरू करण्यात आले आहेत. इयत्ता 1 ली ते 10 वी मराठी व उर्दू माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे ४ युट्युब चॅनेल, आहेत. लवकरच हिंदी व इंग्रजी माध्यमांसाठीही हे चॅनेल्स सुरू करणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून २० जुलैपासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जात आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.