महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जिव्हाळ्याचे संबंध राहिले पाहिजेत

0

पुणे । शिवाजी महाराजांच्या वकील मंडळात 2 गुजराती होते. तेव्हापासून महाराष्ट्र आणि गुजरातचे नाते जिव्हाळ्याचे होते. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहिले पाहिजेत. आपण एक आहोत ही भावना वृद्धिंगत केली पाहिजे, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.सुरतवाला फाउंडेशनच्या वतीने रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला लिखित ’सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी पार पडला. याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली.

सुरतेच्या स्वारीचा उलगडला इतिहास
’सुरतेची स्वारी’, स्वारी दरम्यानचे शिवाजी महाराजांनी घेतलेल्या सर्वधर्मीय काळजीचे प्रसंग बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडले. आई वडीलांची काळजी घेत चला, वाचन करा, शिक्षणाशिवाय सारेच व्यर्थ आहे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहावेत, असे आवाहनही त्यांनी केले. यामुळे ’सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तक प्रकाशन समारंभ आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वितरण समारंभ संस्मरणीय ठरला.

पालकांविषयी आदर बाळगा
आई वडिलांच्या प्रति असलेल्या जिव्हाळ्याचे दर्शन या पुस्तकातून व्यक्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. आई वडिलांप्रती आदर दाखवणे अत्यंत महत्वाचे आहे. सुरतवाला कुटुंबाचे पुण्यात योगदान आहे. शिकणार्‍यांना मदत करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.