नवी दिल्ली/मुंबई | भारताचे 14वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी संसदेसह प्रत्येक राज्यातील विधीमंडळात उत्साहात आणि शांततेत मतदान पार पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) रामनाथ कोविंद आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) मीराकुमार यांच्यात कोण बाजी मारते, त्याचा फैसला मंगळवारी सकाळी 11 वाजता संसदेतील मतमोजणीत होईल. सर्व राज्यांच्या विधीमंडळातील मतपेट्या मतदान आटोपल्यानंतर बंदोबस्तात दिल्लीला रवाना केल्या गेल्या. महाराष्ट्र व उत्तरप्रदेशातील काही आमदार क्रॉस व्होटिंग करतात का, याबाबत उत्सुकता आहे.
नवनिर्वाचित राष्ट्रपति 25 जुलै रोजी पदभार सांभाळतील. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. 2012 मध्ये त्यांनी पीए संगमा यांचा 69 टक्के मतांनी पराभव केला होता. कोविंद यांना मुखर्जी यांच्याहून अधिक मते मिळावीत म्हणून मोदी-शहा यांनी अखेरपर्यंत जोर लावला होता. तर संख्याबळाचे गणित कमजोर असले तरी जातीयवादी शक्ती सर्वोच्च संवैधानिक पदावर बसू नयेत, अशा सोनिया गांधी यांच्या आवाहनानंतर विरोधी पक्षांनीही आपली मते फुटणार नाही याची काळजी घेत जोर लावला होता.
‘मैसूर पेंट्स’चे खास मार्करपेन
लोकनियुक्त खासदारांसाठी हिरव्या तर आमदारांसाठी गुलाबी मतपत्रिका होत्या. सदस्यांना स्वत:चे पेन वापरण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली होती. ‘मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड’ने आयोगाला पुरविलेले खास मार्कर पेन वापरले गेले. त्यासाठी खास मतदान केंद्राबाहेर कर्मचारी नियुक्त होते. त्यांनी हे मतदानाचे पेन पुरविले. गेल्यावेळी हरियाणात राज्यसभेसाठी सुभाष चंद्रांच्या निवडणुकीत चुकीच्या पेनने मतदान केल्यामुळे अनेक मते रद्द झाल्यावरून वाद उद्भवला होता.
कोविंद यांचे पारडे जड
सुमारे 63% मतांसह कोविंद यांचा विजय निश्चित मानला जातो. कोविंद यांना सत्ताधारी एनडीए, जदयू, बीजद, अण्णाद्रमुक, टीआरएस, वायएसआर काँग्रेस सहित अनेक छोट्या पक्षांनी समर्थन दिलेय. मीरा कुमार यांना कॉंग्रेसशिवाय अन्य 17पक्षांचे समर्थन आहे. त्यात तृणमूल काँग्रेस, सप, बसप, राजद, डावे पक्ष, आप, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. समाजवादी पार्टीचे शिवपाल यादव यांनी कोविंद यांना तर ममता बॅनर्जींचा मीरा कुमार यांना पाठिंबा होता. कोविंद यांनी याआधी बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तर मीराकुमार यांनी लोकसभाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
अशी असते प्रक्रिया
लोकसभा तसेच राज्यसभेच्या प्रत्येक खासदाराच्या मताचे 708 मूल्य आहे. आमदाराचे मूल्य राज्याच्या लोकसंख्येनुसार निश्चित होते. महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराचे मतमूल्य 175 आहे. या निवडणुकीत फक्त जनतेतून निवडून आलेले प्रतिनिधीच सहभागी होते; विधानपरिषद आमदारांना मताधिकार नव्हता. ही निवडणूक प्राधान्यक्रमाच्या गुप्त मतदानाने होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतपत्रिकवेर पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे पसंतीचा क्रमांक एक वा दोन द्यायचा होती.
यांनी केले मतदान
- नरेंद्र मोदी
- सोनिया गांधी
- अमित शाह
- मुरली मनोहर जोशी
- राहुल गांधी
- योगी आदित्यनाथ
- देवेंद्र फडणवीस
- चंद्रबाबू नायडू
- नवीन पटनायक
- सर्वानंद सोनोवाल
- गिरीश महाजन
- पंकजा मुंडे
- विनोद तावडे
- एकनाथ खडसे
- सुनील प्रभू
कुणाजवळ किती मते
भाजपा= 4,42,117
कॉंग्रेस= 1,61,478
तृणमूल कॉंग्रेस= 63,847
तेलुगुदेशम= 31,116
मार्क्सवादी कम्युनिस्ट= 27,069
समाजवादी= 26,060
शिवसेना= 25,893
जदयू= 20,935
राष्ट्रीय जनता दल= 18,796
द्रविड़ मुनेत्र कळघम= 18,352
राष्ट्रवादी= 15,857
बहुजन समाज पार्टी= 8,200