पुणे । हर हर महादेव….छत्रपती शिवाजी महाराज की जय… बोल बजरंग बली की जयचा जयघोष…ढोल ताशांचा गजर…लेजीम, हलगी वादकांचा जोश…गावकर्यांचा उत्साह अशा जल्लोषाच्या वातावरणात महाराष्ट्र केसरीमध्ये सहभागी पहिलवानांची स्फूर्तीज्योत हातात घेऊन मिरवणूक काढण्यात आली. फुलांचा वर्षाव करून गावकर्यांनी पहिलवानांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा व शहर तालीम संघाचे कुस्तीपटू स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्र केसरीचा रुबाब आणि वैभव या मिरवणूकीतून कुस्तीप्रेमींना पहायला मिळाले. समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने 61 वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त भूगावामध्ये पहिलवानांची मिरवणूक काढण्यात आली.
पहिल्याच फेरीत अंतिम सामन्याचा थरार
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अतिशय चुरशीचा ड्रॉ निघाला आहे. गेल्या वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, सांगलीचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि शिवराज राक्षे हे दिग्गज पहिलवान, गादीवरील लढतीमध्ये ड्रॉच्या एकाच गटामध्ये आले आहेत. त्यामुळे पहिल्याच फेरीत अभिजित कटके आणि शिवराज राक्षे आमनेसामने येतील, तर चंद्रहार पाटील आणि गणेश जगताप यांच्यात लढत होईल. उभय लढतींमधला विजयी पैलवान दुसर्या फेरीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकतील. दुसरीकडे गादीवरच्या लढतींसाठी सागर बिराजदार आणि विक्रांत जाधव पहिल्याच फेरीत आमने-सामने आले आहेत.