महाराष्ट्र केसरीसाठी संतोष नखाते, किशोर नखाते यांची निवड

0
जालना येथे होणार्‍या 62 व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी होणार रवाना
जयराम नढे यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सत्कार
पिंपरी चिंचवड : जालना येथे होणार्‍या 62 व्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा काळेवाडीतील तापकीरनगर येथे घेण्यात आली. महाराष्ट्र केसरी खुल्या गटात माती विभागातून संतोष नखाते याने शाह फैझल कुरेशी याला चितपट करून बाजी मारली. तर गादी प्रकारात  किशोर नखाते याने प्रमोद मांडेकर याच्यावर विजय मिळवून महाराष्ट्र केसरीसाठी प्रवेश निश्‍चित केला. तसेच जानेवारी 2019 ला मुंबईत होणार्‍या सीएम चषकसाठी किशोर नखाते, प्रसाद सस्ते यांची निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठान यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पै. जयराम उर्फ जयवंत बाबूराव नढे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी मान्यवरांची उपस्थिती…
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आमदार महेश लांडगे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, ऑलिंम्पिकवीर मारुती आडकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, संयोजक व ‘ग’ प्रभाग स्विकृत सदस्य विनोद तापकीर, प्रगतीशिल शेतकरी ज्ञानेश्‍वर हनुमंत तापकीर, संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे, सचिव धोंडीबा लांडगे, खजिनदार दिलीप बालवडकर, उपाध्यक्ष महाद्रंग वाघेरे, काळूराम कवितके, आयोजक निलेश तापकीर, भारत केसरी पै. विजय गावडे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पंच विजय कुटे, विजय नखाते, मनोज दगडे, बाळासाहेब काळजे, निवृत्ती काळभोर, सुत्रसंचालक हंगेश्‍वर धायगुडे आदींसह हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते.
कुस्तीक्षेत्रातील व्यक्तींचा विशेष सन्मान…
प्रसंगी, कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठानच्या यांचे वतीने कुस्तीक्षेत्रात नावलौकिक मिळविण्यार्‍या व्यक्तींचा विशेष सन्मान पुरस्कार देऊन सन्मान यावेळी करण्यात आले. विजेत्या मल्लांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, टॅ्रकसुट बक्षिस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेस पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र केसरी खुल्या गटासाठी माती विभागातून विजय मिळविलेला पै. संतोष नखाते व गादी विभागातून विजयी झालेला पै. किशोर नखाते हे पुण्यातील वारजे माळवाडी येथील सह्याद्री कूस्ती संकुल येथे वस्ताद विजय बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.