पुणे । समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने 61 वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यातील भूगांव येथे ही स्पर्धा दिनांक 20 ते 24 डिसेंबर दरम्यान होणार आहे, अशी माहिती बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संदीप भोंडवे, दिनेश गुंड, मेघराज कटके, शांताराम इंगवले, शिवाजी तांगडे, स्वस्तिक चोंधे, राहुल शेडगे, संदीप इंगवले, अनिल पवार, संदीप तांगडे, कालिदास शेडगे, मनोहर सणस, समीर साळुंके, कुमार शेडगे, अमोल भिलारे, बाजीराव खाणेकर, रामभाऊ चोंधे, नितीन तांगडे, संदीप चोंधे, बाळू सणस, योगेश भिलारे, जितेंद्र इंगवले उपस्थित होते.
चंद्रहार पाटील, अभिजीत कटके व अव्वल मल्ल
बाळासाहेब लांडगे म्हणाले, स्पर्धेत यंदा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (सांगली), गतवर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके , शिवराज राक्षे, तानाजी झुंजुरके, साईनाथ रानवडे (सर्व पुणे), सागर बिराजदार (लातूर), किरण भगत (सातारा), महेश वरुटे,कौतुक डाफळे (कोल्हापूर), माऊली जमदाडे, महादेव सरगर (सोलापूर) आदी अव्वल मल्ल जेतेपदासाठी लढतील. इतर वजनी गटात सुरज कोकाटे, गणेश जगताप, अभिषेक तुरकेवाडकर, तानाजी विरकर, ज्योतिबा आटकळ असे अनेक अव्वल मल्ल झुंजताना दिसतील. मागील वर्षी वारजे येथे तर 2009 मध्ये सांगवी व 2014 मध्ये भोसरी येथे ही स्पर्धा झाली होती.
मुख्यमंत्री व पवारांची उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (दि.21) विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी गिरीश बापट, विश्वास देवकाते आदी उपस्थित राहणार आहेत. तर रविवार, दिनांक 24 डिसेंबर रोजी स्पर्धेच्या समारोपाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आदी उपस्थित राहणार आहेत. शांताराम इंगवले म्हणाले, महाराष्ट्र केसरी विजेत्याचा किताब पटकाविणा-या मल्लास चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच चारचाकी गाडी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. उपमहाराष्ट्र केसरी साठी बुलेट व 97 किलो वजनी गटातील गादी आणि माती विभागातील विजेत्याला देखील बुलेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवाजी तांगडे म्हणाले, कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या जन्म तालुक्यात प्रथमच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असल्याने स्पर्धेसाठी ग्रामस्थ उत्सुक आहेत. कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत स्पर्धेसाठी मैदान तयार करण्यात असून 40 हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 50 बाय 50 फूट आकारात गादीचे दोन व मातीचे दोन आखाडे तयार करण्यात येणार आहे. स्पर्धा योजनाबद्ध व्हावी यासाठी सर्व ग्रामस्थ काम करीत आहेत.
माती व गादी विभागात
शांताराम इंगवले म्हणाले, महाराष्ट्र केसरी विजेत्याचा किताब पटकाविणा-या मल्लास चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच चारचाकी गाडी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. उपमहाराष्ट्र केसरी साठी बुलेट व 97 किलो वजनी गटातील गादी आणि माती विभागातील विजेत्याला देखील बुलेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.