‘महाराष्ट्र केसरी’ पुढेही आंतरराष्ट्रीय कुस्तीचे जग दिसले

0

मुंबई । ‘महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्राच्या मातीतली कुस्ती आहे. दीर्घकाळ चालत आलेली ही प्रतिष्ठेची परंपरा असली तरी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील खेळाडूंनी चमकायला हवे. महाराष्ट्र केसरीपलीकडेही आकाश आहे. त्यासाठी आपल्या कुस्तीगिरांची, त्यांच्या पालकांची आणि सरकारचीही मानसिकता बदलायला हवी’, असे मत नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा महाराष्ट्राचा गुणी मल्ल राहुल आवारे तसेच त्याचे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कारप्राप्त मल्ल काका पवार यांनी व्यक्त केले. राहुलने ’महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयाला खास भेट दिली आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या. या वेळी आपला सराव, रिओ ऑलिम्पिक निवड चाचणीत झालेला अन्याय, गुरूंचे योगदान याबाबत तो भरभरून बोलला. तो म्हणाला की, ’माझ्या वडिलांचीही इच्छा होती, की मी ’महाराष्ट्र केसरी’ व्हावे. त्यात चुकीचे काही नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय पदक जिंकणार्‍या खेळाडूला जेव्हा प्रसिद्धी दिली जाते, सरकारकडून त्याला नोकरी मिळते, सुविधा दिल्या जातात, तेव्हाच पालकांची ही मानसिकता बदलेल. आपल्या मुलाला किंवा मुलीला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवले पाहिजे, असे त्यांना वाटू लागेल.’ काका पवार म्हणाले की, ’राहुलने महाराष्ट्र केसरी व्हावे म्हणून त्याचे वडील त्याला वजन वाढवायला सांगत. मग आमच्यात वाद होत असे. त्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हावे हीच माझी धडपड होती आणि आज त्याने मोठी झेप घेतली आहे.’

महाराष्ट्र आणि हरियाणा
’महाराष्ट्रातील कुस्तीत मोठ्या संख्येने मल्ल सहभागी होतात, पण प्रत्यक्षात कुस्तीच्या राष्ट्रीय शिबिरात महाराष्ट्रातून फार कमी मुले जातात. सरकारचे पाठबळ मिळाले तर त्यात बदल होईल. हरयाणाप्रमाणे आपणही प्रगतीपथावर जाऊ’, असा विश्‍वासही राहुल आणि पवार यांनी व्यक्त केला. ’राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेत्या महाराष्ट्रातील खेळाडूंना आपल्या सरकारने अनुक्रमे 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. हरयाणा सरकारने मात्र आपल्या राज्यातील सुवर्णविजेत्यांना दीड कोटींचे इनाम दिले आहे’, याकडेही दोघांनी लक्ष वेधले.