पुणे । गौरवशाली महाराष्ट्र केसरीचा गेल्या 56 वर्षांचा इतिहासावर प्रकाश टाकणार्या महाराष्ट्र केसरी यशोगाथा पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. क्रीडालेखक संजय दुधाणे लिखित हे पुस्तकाची विशेष आवृत्तीला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कालावधीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भूगाव येथील मामासाहेब मोहोळ कुस्तीनगरीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पद्ममविभूषण शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी यशोगाथा पुस्तकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वास नांगरे पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगांवकर, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, लेखक संजय दुधाणे उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनानंतर महाराष्ट्र केसरी किताब हा राज्याचा गौरव आहे असे सांगून नामदेव शिरगांवकर म्हणाले की, महाराष्ट्र केसरीच्या गेल्या 56 वर्षांच्या इतिहासाला हिंदकेसरी यशोगाथा या पुस्तकामुळे उजाळा मिळाला आहे. हरहुन्नरी क्रीडालेखक दुधाणे यांच्या या पुस्तकामुळे नव्या मल्लांना प्रेरक इतिहास वाचण्यास मिळणार आहे. बाळासाहेब लांडगे म्हणाजे की, कुस्तीवर आणि यशस्वी मल्लांवर पुस्तके प्रकाशित झाली पाहिजे हे काम युवा लेखक संजय दुधाणे हे करीत आहेत.आजपर्यंतच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याचा सचित्र इतिहास महाराष्ट्र केसरी यशोगाथा पुस्तकाव्दारे प्रथमच प्रकाशित होत आहे.
80 पानी पुस्तकात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा श्रीगणेशा कसा झाला, कुस्ती अधिवेशने कधी झाली, कुस्तीगीर मानधन योजना विषयांवर संग्राह्य माहिती आहे. प्रा. दुधाणे यांचे हे 20 वे पुस्तक असून ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यावरही त्यांनी वाचनीय पुस्तक लिहिले होते. हिंदकेसरी यशोगाथा हे पुस्तकाचाही यंदा प्रकाशन झाले असून लंडन व रिओ ऑलिम्पिकचे त्यांनी वृत्तांकन केले आहे. महाराष्ट्र केसरी यशोगाथा पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली असून आता 51 वा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेसह दुसरी आवृत्ती नववर्षात प्रकाशित केली जाणार आहे.