मुंबई: (निलेश झालटे) ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत सलग तीनदा झेंडा रोवणाऱ्या जळगावच्या विजय चौधरी यांच्या नोकरीची फाईल नेमकी कुठे अडकली आहे? याचा उलगडा होत नसल्याने विजय चौधरी यांना वारंवार विधानभवनाचे खेटे घालावे लागत आहेत. आज, शुक्रवारी देखील विजय चौधरी विधानभवनात आले होते. यावेळी त्यांनी नोकरीच्या अध्यादेशावर मुख्यमंत्र्यांनी हस्ताक्षर केले असून ती सचिवांकडे गेली असल्याचे सांगत अद्याप पोस्ट कुठली मिळणार याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले. या वृत्ताला दुजोरा देत चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी अध्यादेशावर हस्ताक्षर झाले असून पद हे अद्याप गोपनीय ठेवले असल्याचे सांगितले आहे. नोकरीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी हस्ताक्षर केले असले तरी प्रत्यक्ष नोकरी कधी मिळेल? हा प्रश्न अनुत्तरीय आहे.
नोकरीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो असता त्यांनी अध्यादेशावर सही करून फाईल सचिवांना दिली असल्याची माहिती दिल्याचे विजय चौधरी यांनी सांगितले. मात्र पोस्ट कुठली मिळणार? असे विचारल्यावर त्याबाबत काहीही माहिती नसल्याचे चौधरी यांनी सांगितले. विजयने याआधी सांगितले होते की, मला दहावी पासूनच लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेची तयारी करायची हौस होती, मला पोलीस ऑफिसर बनायचे स्वप्न होते. मात्र कुस्तीच्या दीर्घ सरावाने अभ्यास शक्य झाला नाही. विजयच्या प्रयत्नाला शासकीय दरबारी थोडी मदत मिळाली तर महाराष्ट्राला एक लढवय्या मल्लाबरोबर नक्कीच एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मिळेल याची खात्री आहे. महाराष्ट्रातील सर्व नामांकित खेळाडूंना मुख्यमंत्र्यांनी नोकरी दिली, तर त्यांचे सरकार महाराष्ट्रातून कधीच जाणार नाही, असा भोळा आशावाद विजयने याआधी व्यक्त केला होता, मात्र विजयच्या या आशावादावर सरकार कधी खरे उतरणार? याबाबत प्रश्नचिन्हच आहे.
‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत सलग तीनदा झेंडा रोवणाऱ्या जळगावच्या विजय चौधरी याला तात्काळ शासकीय सेवेत घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली गेल्या वर्षी केली होती. विधानसभेत देखील विजय चौधरी याचे अभिनंदन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही घोषणा केली होती. विजयला शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली असून कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरीला नोकरी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी सांगितले होते. विजयला नोकरी मिळावी यासाठी चाळीसगावचे आ. उन्मेष पाटील प्रयत्नशील आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही विजयच्या नोकरीचे चित्र स्पष्ट होत नसल्याने संदिग्धता निर्माण झाली आहे.