शरद पवार यांचे प्रतिपादन : राज ठाकरे यांनी घेतली ऐतिहासिक प्रगट मुलाखत
पुणे : मी नेहमी महाराष्ट्रापेक्षा देशाला महत्व दिले आहे, अशी स्पष्ट कबुली देत, महाराष्ट्र घडविण्यासाठी दिल्लीची सत्ता हातात हवी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व देशातील मुरब्बी नेते शरद पवार यांनी केले. पुण्यातील बीएमसी महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांची अत्यंत रोखठोक मुलाखत घेतली. ही मुलाखत ऐकण्यासाठी 25 हजाराच्यावर पुणेकरांनी गर्दी केली होती. राज्याच्या इतिहासात झालेली ही सगळ्यात मोठी आणि कुतूहल निर्माण करणारी मुलाखत ठरली आहे. 27 वर्षांचा ‘जनरेशन गॅप’ असूनदेखील एका पिढीने जुन्या पिढीची घेतलेली ही मुलाखत ठरली. सत्तेत बसलेल्या लोकांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, त्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. परंतु, फुले-शाहू-आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र या रस्त्याने जाणार नाही, असेही यावेळी पवारांनी ठासून सांगितले. जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रूप यांच्या विद्यमाने ही मुलाखत आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात ही अभूतपूर्व मुलाखत ठरली आहे.
मादींची नेहरूंवरील टीका अयोग्य!
हल्लीच्या राजकीय नेत्यांना बोलताना भान राहात नाही. देशाच्या संसदेत पंडित जवाहरलाल नेहरूंवर वैयक्तिक टीका केली गेली, हे अयोग्य आहे. प्रत्येक राजकीय नेत्याने समोरच्या व्यक्तीचा सन्मान ठेवला पाहिजे. वैचारिक भूमिका मांडली पाहिजे. सध्या जे काही सुरू आहे हे फारकाळ चालणार नाही. यात निश्चितच बदल होईल, असे सांगत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळत टीका केली. महाराष्ट्राला योगदान देताना देशाचा विसर पडता कामा नये. देशाचे नेतृत्व करायचे असेल तर देशाकडे लक्ष द्यायला हवे. मोदींशी असलेल्या मैत्रीबाबत पवार म्हणाले, मी दहा वर्षे कृषी खाते सांभाळत होतो. मोदींनाही कृषीक्षेत्राबद्दल आवड आहे. पण, ते दिल्लीत आले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर वैयक्तिक टीका करायचे. त्यामुळे काँग्रेसचे मंत्री त्यांच्यावर नाराज असायचे. अशातच गुजरातचा प्रश्न आला की सर्वजण दुर्लक्ष करायचे. परंतु, मी गुजरातचा प्रश्न हा तेथील जनतेचा आहे, हे समजून सांगून ते प्रश्नमार्गी लावण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे मोदींना माझ्याबद्दल आदर आहे. यातूनच त्यांनी बोट धरून राजकारणात आल्याचे ते वक्तव्य केले. खरं तर आम्ही एकाच काळात राजकारणात आलो. त्यांच्या त्या वक्तव्यात काहीही तथ्य नाही. असे पवार म्हणाले. तसेच मोदींच्या गुजरात प्रेमाबाबतच्या प्रश्नावर पवार म्हणाले, गुजरातचा अभिमान जरूर बाळगा पण, देशाचाही विचार करा. मोदींमध्ये प्रचंड कष्ट करण्याची क्षमता आहे, असा उल्लेखही यावेळी पवार यांनी केला.
दिल्लीत महाराष्ट्रविरुद्ध लॉबी सक्रीय
खरं बोलण हे चांगले आहे. पण, ते अडचणीचे ठरणार असेल त्यामुळे कुणाचे मन दुखावणार नसेल तर ते बोलता कामा नये हे शिकले पाहिजे. चौकटीच्या बाहेर कधी जाता कामा नये. अलिकडे व्यक्तिगत हल्ल्यांची आस्था लोकांना वाटत आहे. यावेळी आपण कुठल्या पदावर आहोत याचे भान आपल्याला नसते. टीका करण्याचा अधिकार आहे. जवाहरलाल नेहरुंनी देशासाठी काहीच केले नाही असे म्हणणे हा बेजबाबदारपणा आहे. दुसर्यांच्या विचारांचा सन्मान कसा करावा याचा आदर्श अटलबिहारी वाजपेयींनी संसदेत घालून दिला. मी संरक्षणमंत्री असताना महाराष्ट्रात दंगली पेटल्या होत्या. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे जगाचे लक्ष असल्याने ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मला राज्यात पाठविण्यात आले. असेही दिल्लीत कान भरणारे लोक भरपूर असून, ते सतत इथून तिथे फिरत असतात. मराठी नेते मोठे होऊ नयेत म्हणून दिल्लीत एक लॉबी कार्यरत आहे, असा गौप्यस्फोट पवार यांनी केला. काँग्रेसबद्दल बोलताना पवार म्हणाले, ज्यामधले समजत नाही ते समजून घेण्याचा सध्या राहुल गांधी प्रयत्न करत आहेत. जुनी काँग्रेस आणि आताची काँग्रेस यामध्ये प्रचंड फरक आहे. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जाण्याने प्रचंड अस्वस्थ झालो असे पवार म्हणाले.
राज्यात सामाजिक तेढ वाढत आहे!
बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण या नेत्यांनी कधीही जातपात पाहिली नाही. बाळासाहेबांनी तर अनेक अनेक मागासवर्गातील व्यक्तींना जनाधार नसतानाही मंत्रिपदावर नेऊन ठेवले. साबीर शेख यांना मंत्री केले. यावेळी त्यांनी जात पाहिली नाही. सध्या जातीयवादी संघटनांनी बाळसे धरले आहे. दोन समाजांना आपसात लढवून आपला राजकीय फायदा लाटण्याचा त्यांचा विचार आहे. हे फार काळ चालणार नाही. हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांच्या मार्गानेच यापुढे मार्गक्रमण करेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. यावेळी पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखलाही दिला. आरक्षणाबाबत बोलताना पवार म्हणाले, जातपात न बघता आर्थिक निकषावरच आरक्षण दिले गेले पाहिजे. याचवेळी पवार यांनी हजारो तरूणांना नोकर्या देणार्या बीव्हीजी ग्रुपचेही कौतुक केले. सध्या सुरू असेलला जातीयवाद मला सर्वाधिक चिंतेचा विषय वाटतो. राज्यातील राजकीय नेत्यांनी हे मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जात, धर्म, भाषा यातील अंतर, कटूता मिटवले पाहिजे, असेही पवार म्हणाले. देशाची नवी पिढी देशाला नवी दिशा देईल, असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
बुलेट ट्रेन कुचकामी
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने काहीही साध्य होणार नाही. मुळात या मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या खूपच कमी आहे. सध्याच्या गाड्यांमध्येही फारशी गर्दी नसते. त्यातही महाराष्ट्रातून अहमदाबादकडे कोण आणि कशाला जाणार? तुम्ही म्हटले तसे ढोकळा, फाफडा खाण्यासाठी लोक जाणार का? या बुलेट ट्रेनची काहीही गरज नाही. या ट्रेनच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याची कुणाचा डाव असेल तर मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही, त्यासाठी तुम्ही-आम्ही वेळ पडल्यास उभे राहू, असे पवार म्हणाले.
इंदिरा गांधी की यशवंतराव चव्हाण
राज्यातील जनतेने 50 वर्षे माझ्यावर विश्वास दाखवला. मला निवडून दिले. यासाठी मी महाराष्ट्राचा आभारी आहे. मी कधीही माझ्यावरील आरोपांना उत्तर दिले नाही. कारण, मला माहित असते, या आरोपांमुळे त्रास होईल पण ते सिद्ध होणार नाहीत. रॅपीड फायर प्रश्नांना उत्तर देताना मात्र पवार यांनी आपले राजकीय कौशल्य वापर काही प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधी की, यशवंतराव चव्हाण या प्रश्नाला एकावाक्यात उत्तर देणे पवारांनी टाळले. शेतकरी की उद्योगपती यावर मात्र ते शेतकरी म्हणाले. अमराठी उद्योगपती की मराठी उद्योगपती यावर ते फक्त उद्योगपती म्हणाले. तर दिल्ली की महाराष्ट्र यावर पवार म्हणाले, दिल्ली. कारण, महाराष्ट्र व्यवस्थित ठेवायचा असेल तर दिल्ली हातात असायला हवी. काँग्रेस की भाजप यावर पवार म्हणाले काँग्रेस. राज की उद्धव या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ठाकरे कुटुंबीय. अशाप्रकारे रॅपीड फायर प्रश्नांना पवारांनी मुत्सद्दीपणे उत्तरे दिली.
अशोक सराफ, लीला गांधी यांना पुरस्कार
जागतिक मराठी अकादमीच्या या कार्यक्रमात शरद पवार यांच्याहस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अभिनेत्री लीला गांधी, अभिनेते विलास, अशोक सराफ, नागराज मंजुळे, मोहन आगाशे, चंदू बोर्डे, संदीप वासलेकर, विश्वजित कदम, बीव्हीजेचे हनुमंतराव गायकवाड यांना गौरविण्यात आले. तर शरद पवार यांना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला ठाकरे आणि पवार कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित होते. काही यशस्वी शेतकर्यांचाही सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. राज ठाकरे यांनी या मुलाखतीच्या सुरूवातीलाच आपल्यावर दडपण आल्याचे सांगितले. मात्र, नंतर या दोन नेत्यांची चौफेर फटकेबाजी हजारो प्रेक्षकांनी अनुभवली.
काय म्हणाले शरद पवार?
– देशात सकारात्मक राजकारण उरलेले नाही
– पायात पाय घालायचे उद्योग बंद करा
– दिल्लीत कान भरणारे बरेच लोक आहेत
– मराठी नेते होवू नये म्हणून दिल्लीत एक लॉबी काम करते
– मराठी माणसाने एकत्र राहून महाराष्ट्र निर्माण करायला हवा
‘रॅपिट फायर’
प्रश्न : इंदिरा गांधी की यशवंतराव चव्हाण?
उत्तर : एकाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाचे आहे तर एकाच नेतृत्व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र पातळीवर महत्वाचे आहे.
प्रश्न : शेतकरी की उद्योगपती?
उत्तर : शेतकरी
प्रश्न : अमराठी उद्योगपती की मराठी उद्योगपती?
उत्तर : उद्योगपती
प्रश्न : दिल्ली की महाराष्ट्र?
उत्तर : दिल्ली
प्रश्न : काँग्रेस की भाजप?
उत्तर : काँग्रेस
शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न
राज ठाकरे की उद्धव ठाकरे?
उत्तर : ठाकरे कुटुंब