महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वय ठेवावा

0

धुळे । महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे 2017 रोजी सकाळी 8 वाजता पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभ होईल. पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा होईल. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने आपापली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी येथे दिले.

विविध अधिकार्‍यांची उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सकाळी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 वा वर्धापन दिन समारंभाची पूर्व तयारी, कार्यक्रमाची रुपरेषा, विचार विनियमासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, अपर तहसीलदार ज्योती देवरे, कवी जगदीश देवपूरकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी सांगितले, जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.10 वाजता ध्वजारोहण सोहळा होणार असल्याने समारंभाची पूर्व तयारी 30 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करावी. कार्यक्रमाच्या दिवशी पोलिस बॅण्ड पथक, पोलिस पथक वेळेपूर्वी उपस्थित ठेवावे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करावी, तसेच परिसर स्वच्छ ठेवावा. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसरही स्वच्छ ठेवावा. पोलिस कवायत मैदानावर पाण्याचा टँकर उपलब्ध करुन द्यावा. प्रथमोपचाराचे साहित्यासह वैद्यकीय पथक हजर ठेवावे. शिक्षण विभागाने प्रभात फेर्‍या व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. बांधकाम विभाग व महानगरपालिकेने पोलिस मुख्यालय कवायत मैदानाची डागडुजी व दुरुस्ती करावी. तसेच रोलिंग करावे. पोलिस विभागाने सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून पुरेशी दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक विभागाने आपल्याला नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी सांगितले.