जळगाव। युवकांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी राज्य शासन 2012 पासून राज्य युवा धोरण राबवित आहे. जिल्ह्यांतील युवक व युवती यांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच युवकांना जिल्ह्यांत कार्य करण्याकरिता प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर युवकांसाठी कार्य करणार्या युवक यवुती व संस्था यांना शासनातर्फे युवा पुरस्कार देण्यात येतो. जिल्हा युवा पुरस्कार सन 2015 व सन 2016 हे जाहीर करण्यात आले असून यात 2015 साला करीता यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव तर 2016 साला करीता केशवस्मृती प्रतिष्ठान जळगाव यांचा समावेश आहे. तर सन 2016 साठी जिल्हा युवा पुरस्कार युवकासाठी डॉ. श्रेयस घनःश्याम महाजन यांना तर युवतीसाठी दिपमाला राजेंद्र वंजारी यांना जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्याहस्ते वितरण
यासोबतच क्रीडा व युवकसेना संचालनालयातर्फे जिल्हा गुणवंत खेळाडू म्हणून सिद्धांत ईश्वर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सिद्धांत पाटील यांनी तायक्वांद खेळात जिल्हास्तरापासून राज्यपातळीपर्यंत प्राविण्य मिळविले आहे. सिद्धांत हे राष्ट्रीय स्पर्धेत देखील सहभागी झाले आहेत. गुणवंत क्रीडा मार्गदर्शकचा पुरस्कार अनिल हरिचंद्र माकडे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर गुणवंत क्रीडा संघटक, कार्यकर्ता हा पुरस्कार जैन स्पोर्टस् अॅकडमीचे समन्वयक फारूख अब्दुल्ला शेख यांना जाहीर झालेला आहे. वरील पुरस्कार्थांना महाराष्ट दिन 1 मे रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, डॉ. जयप्रकाश दुबळे, अतुल निकम, डॉ. जी. ए. उस्मानी, दिपक परदेशी, विनोद ढगे, यामिनी कुळकर्णी, भुषण लाडवंजारी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित राहणार आहेत.