पुणे । महाराष्ट्र दिनानिमित्त पाणी फाऊंडेशनतर्फे ’महाश्रमदान’ योजना आखण्यात आली आहे. वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावात हे महाश्रमदान होणार आहे. जलमित्र बनून यात सहभागी होण्याची संधी शहरी युवकांना यातून मिळणार आहे. यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन दुष्काळावर मात करण्याचे आवाहन अभिनेता आमीर खानने केले आहे. सिम्बॉयसिस विद्यापीठातील कार्यक्रमात आमीर खानने जलमित्र आणि महाश्रमदान योजनेची माहिती दिली. यावेळी पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सिम्बॉयसिसचे डॉ. शं. ब. मुजुमदार, विद्या येरवडेकर, संजीवनी मुजुमदार उपस्थित होते.
युवकांनी सहभाग घ्यावा
या योजनेत सहभागी होण्यासाठी www.jalmitra.paanifoundation.in या वेबसाईटवर रजिस्टर करून कोणीही जलमित्र होऊ शकतो. 22 मार्च 2018 या विश्वजलदिनी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. तीन आठवड्यात एक लाखपेक्षा जास्त जणांनी सहभागी होण्यासाठी साईन अप केले आहे. शहरी तरुणांना गावातील नागरिकांना मदत करून त्यांच्याशी जोडून घेण्याची ही संधी आहे. जास्तीजास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन आमीर खानने केले आहे.
शहरातील पाणीप्रश्नावर लक्ष घालणार
पुढील पाच वर्षात पानी फाऊंडेशनची गरज वाटू नये,’ असं मत आमीरनं व्यक्त केलं. भविष्यात शहरातील पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही आमीरनं सांगितलं.