नेरुळ । घंटागाडी कामगारांना किमान काम वेतनवाढ मिळावी यासाठी महाराष्ट्र् नवनिर्माण कामगार सेना आक्रमक झाली आहे. यासाठी ठिय्या व वेळ पडली तर कचराफेक आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या कामगार सेनेने दिला आहे. घंटागाडीचे कंत्राट महापालिकेने एजी इंव्हीरो इन्फ्रा प्रोजेक्टस या कंपनीला दिलेले आहे. यात एकूण 450 कामगार काम करतात. मात्र, उद्योग व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार पालिकेच्या महासभेत ठराव मंजूर झालेला आहे. त्यानुसार कामगारांना वाढीव वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र, आद्यप फक्त कागदावरच असल्याचा आरोप मनसेने केला आहे. नवी महानगरपालिका प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाने घंटागाडी कामगारांना पालिकेने समान काम समान वेतन वाढीतून वगळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली एरोली, कोपरखैरणे व बेलापूर येथील पार्किंगमध्ये 11 व 12 डिसेंबर रोजी दोन दिवसीय ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. मात्र तरीदेखील पालिकेने कोणताही निर्णय घेतला नाही अथवा मागण्या मान्य न केल्यास 13 नोव्हेंबरपासून मनसेतर्फे शहरातील मुख्य रस्त्यावर कचरा फेक आंदोलन केले जाणार आहे.
पालिकेने घंटागाडी कामगार वगळले
विविध विभागांतील कंत्राटी कामगारांना कायम करा, समान काम समान वेतन तत्त्वाची तत्काळ अंमलबजावणी करा यांच्यासह इतर मागण्या कामगार संघटनाकडून प्रशासनापुढे ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, पालिका प्रशासनाकडून घंटागाडी कामगार वगळण्यात आले आहे. आयुक्तांच्या पत्रात कचरा वाहतुकीचा उल्लेख असूनही व सदर कंत्राटदाराच्या करारनाम्यात किमान वेतनवाढीची तरतूद असतानाही पालिका प्रशासन निरर्थक तांत्रिक मुद्द्यावर घंटागाडी कामगारांचे वेतनवाढ टाळत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडून करण्यात आला आहे. त्यानुसार 11 व 12 डिसेंबर रोजी पार्किंगमध्ये ठिय्या आंदोलन केले जाईल, याशिवाय जर मागण्या मान्य न केल्यास 13 नोव्हेंबरपासून कामगार पालिका हद्दीतील मुख्य रस्त्यावर कचरा फेको आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राजेश उज्जेनकर यांनी सांगितले.