दोंडाईचा: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर राज्यातील एकूण 6 महसुली विभागातून प्रत्येकी एक बाजार समितीच्या सदस्याची निवड करावयाची असते. त्यातून नाशिक विभागातून दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण बाजीराव पाटील यांची निवड शासनाकडून करण्यात आली. याबाबत 6 जून रोजी अवर सचिव सु. बा. तुंभारे यांच्या सहीने प्रसिद्ध झाला आहे.
दरम्यान, शिंदखेडा तालुक्याला पणन मंडळावर संचालक म्हणून काम करण्याची पहिल्यांदा नारायण पाटील यांच्या रूपाने संधी मिळाली आहे. नारायण पाटील यांना बाजार समितीच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव असून त्यांनी अनेक वर्षे बाजार समितीचे संचालक म्हणून काम केले आहे. शिवाय गेल्या 6 महिन्यापासून ते दोंडाईचा बाजार समितीचे सभापती म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी सन 2006 07 मध्ये त्यांनी दोंडाईचा बाजार समितीतील गैरव्यवहार देखील चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची वेळ तत्कालीन शासनावर आली होती. बाजार समितीच्या कामकाजाचा चांगला अनुभव असल्यामुळे त्यांची निवड पणन मंडळावर संचालक म्हणून करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यानुसार नाशिक विभागातून दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण बाजीराव पाटील यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, शिखर बँकेचे माजी अध्यक्ष सरकारसाहेब रावल , नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, जि.प.चे गटनेते कामराज निकम, प. स. सभापती मनीषा गिरासे,यांच्यासह बाजार समितीच्या संचालकांनी अभिनंदन केले आहे.