मुंबई- महाराष्ट्र परिचर्या परिषदेची निवडणूक विहित मुदतीत न झाल्यास परिषदेवर प्रशासकाची नेमणूक करता येण्यासाठी महाराष्ट्र परिचारिका अधिनियम-1966 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्यातील परिचारिकांची नोंदणी व प्रशिक्षण यांचे विनियमन करणाऱ्या विधींचे एकत्रिकरण करण्यासाठी व त्यात अधिक चांगली तरतूद करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र परिचारिका अधिनयिम-1966 राज्यात लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या कलम 3 मध्ये परिषदेची प्रस्तावना आहे. राज्यातील नोंदणीकृत परिचारिका संवर्गातील विहित पद्धतीने निवडून आलेल्या व्यक्तींची आणि शासन नामनिर्देशित व्यक्तींची मिळून परिषदेची संरचना आहे. महाराष्ट्र परिचर्या परिषदेची यानुसार स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या अधिनियमातील कलमानुसार परिषदेचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही अध्यक्ष व उपाध्यक्ष कार्यरत राहतात. त्यासाठी या कलमामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. त्यानुसार या अधिनियमातील कलम 4 च्या पोट कलम (2) मध्ये अतिरिक्त मजकूर समाविष्ट करण्यास आणि पोट कलम (3), (4)आणि (5) वगळण्यासाठी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर कलम 40 मध्ये कलम (2)नंतर नवीन पोट कलम (3) समाविष्ट करण्यासही मान्यता देण्यात आली. याबाबतचे विधेयक आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.