मुंबई:- दिल्लीमधील निझामुद्दीन मरकजमध्ये पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे शेकडो लोकांना करोनाची लागण झाल्याची भीती असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निझामुद्दीनप्रमाणेच तबलिगी जमातने वसईतही तितकाच मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली होती. पण महाराष्ट्र पोलिसांनी शेवटच्या क्षणी परवानगी नाकारली आणि मोठे संकट टळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईमध्ये १२-१३ मार्च रोजी सनसिटी येथे हा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला ५० हजार लोक उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमासाठी जानेवारीत परवानगी मागण्यात आली होती. पालघर पोलिसांनी त्यासाठी परवानगी दिली होती. कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी यांनी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांच्यासोबत बैठक घेतली आणि या कार्यक्रमासंबंधी सविस्तर चर्चा केली. यावेळी किती लोक कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत यासंबंधीही चर्चा करण्यात आली. हजारो लोक कार्यक्रमासाठी हजर राहणार असून यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यानंतर करोना व्हायरसचा धोका लक्षात घेता देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आणि कार्यक्रम रद्द आला.