‘महाराष्ट्र बंद’चे गुन्हे मागे घेतलेच नाही

0

पुणे । कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तीन जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद पाळण्यात आला होता. या बंदमध्ये सामान्य दलित कार्यकर्त्यांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली होती. मात्र, यासंदर्भातील कोणताही आदेश राज्य सरकारकडून आला नसल्याचे पोलिस आयुक्त कार्यालयाने माहिती अधिकारात कळविले आहे. त्यामुळे या घटनेला पाच महिने उलटून गेल्यावरही राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

मुख्यमंत्र्यांची पोकळ घोषणा
जानेवारी महिन्यात कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यभरात बंद पाळला गेला. हिंसाचाराच्या घटनेनंतर एकूण 17 अ‍ॅट्रॉसिटी आणि सहाशेहून अधिक गुन्हे दाखल झाले. त्यात 1199 आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन हजार 53 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच, महाराष्ट्र बंददरम्यान दलित तरुणांवर दाखल गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केली होती.

अद्याप आदेशच आलेला नाही
या संदर्भात आम आदमी पक्षाचे गणेश ढमाले यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारणा केली असता राज्य सरकारकडून याबाबत कोणताही आदेश आला नसल्याचे पोलिस आयुक्त कार्यालयाने कळविले आहे. त्या निषेधार्थ आप पक्षाने नुकतेच पुणे स्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन केले. तसेच, राज्य सरकारच्या आश्‍वासनानुसार तातडीने आदेश काढून गुन्हे मागे घेण्याच यावे, अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले. या वेळी आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत, राजेश चौधरी, गणेश ढमाले, सुभाष करांडे, अभिजित मोरे, रिपब्लिकन सेनेचे संतोष कांबळे, सिद्धार्थ कांबळे आदी उपस्थित होते.