महाराष्ट्र मास्कमुक्त , कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले
मंत्रीमंडळाचा बैठकीत निर्णय ; आजपासून नागरीक घेणार मोकळा श्वास
मुंबई – गेल्या 2 वर्षापासून जगभरात कोरोना महामारीची दहशत कायम होती. मात्र, आता हळूहळू महामारी नियंत्रणात येत असल्याने कोरोनामुळे घातलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातही गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला होणार्या मिरवणुका मोठ्या जल्लोषात काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुने ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्यावतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
….. आता लोकल प्रवासासाठी कोरोनाची लससक्ती नाही
लोकल प्रवास करतायेत आणि कोरोनाची लस घेतली नाही तर घाबरण्याचे कारण नाही, कारण, शासनाने प्रवास करतांना असलेली लसीकरण सक्ती केली होती. त्यामुळे लोकलमधून प्रवास करतांना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता लोकल मधून प्रवास करणार्यांना लस सक्तीची राहणार नसल्याचे शासनाने आदेश काढले आहेत. त्यामुळे अनेकांना प्रवास करतांना सुलभ जाणार आहे.
….. मास्क घालणे ऐच्छिक ः राजेश टोपे
कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये, यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले. त्याचसोबत मास्क घालणे ऐच्छिक असेल. त्यावर कुठलीही सक्ती केली जाणार नाही असे राजेश टोपेंनी स्पष्ट केले.
दरम्यान, मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आल्याचं राजेश टोपे यावेळी म्हणाले. अनिवार्य नसला, तरी ऐच्छित मास्क वापर आहेच. तसेच, मास्कचा वापर ऐच्छिक केला असला तरी लोकांनी आपली आणि इतरांची काळजी घेण्यासाठी जमेल तिथे मास्क घालावा. त्यामुळे गुढीपाडवा, मुंबईतल्या शोभायात्रा, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे दिवस उत्साहात आपण साजरे करू शकू. येणारे सण देखील पूर्ण उत्साहात साजरे करता येतील, असे राजेश टोपे म्हणाले.
——–
—