महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात मुलींच्या संख्येत 66 अंकांनी वाढ

0

पुणे । राज्यात आरोग्य खात्याने लिंगनिदानाचे प्रकार रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याबरोबरच त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2016 आणि 2017 या दोन्ही वर्षातील मुलींच्या जन्माच्या अंदाजित प्रमाणाची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली. एक हजार मुलांमागे सर्वाधिक मुलींची संख्या असणार्‍या राज्यातील शहरांमध्ये पुणे आघाडीवर आहे. पुण्यामध्ये 2016 वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी मुलींचे प्रमाण 63अंकांनी वाढले आहे. राज्यात पुण्यासह अठरा जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण वाढले आहे; तर 14 जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण अद्यापही घटलेलेच आहे.

मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढले
राज्यात 2010पासून एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण 2014 पर्यंत वाढत गेल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. 2015 आणि 2016 या दोन वर्षांत लिंगगुणोत्तराचे प्रमाण कमी-जास्त होत राहिले. परंतु, 2017 वर्षी राज्यातील लिंगगुणोत्तराचे प्रमाण 913 असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रमाण 9 अंकांनी वाढले आहे. अर्थात मुलींच्या जन्माचे महाराष्ट्रात स्वागत होण्यास पुन्हा सुरुवात झाल्याचे चांगले चित्र दिसू लागले आहे. 2010 मध्ये राज्यात 854 एवढे मुलींचे प्रमाण होते. त्यात वाढ होऊन 2017 मध्ये 913 एवढे प्रमाण वाढले आहे. म्हणजेच गेल्या सात वर्षांमध्ये राज्यात मुलींचे प्रमाण 59 अंकांनी वाढले आहे.

शहर-जिल्ह्यांमध्ये पुणे पुढे
2016 या वर्षाच्या तुलनेत 2017 वर्षामध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढणार्‍या शहर-जिल्ह्यांमध्ये पुणे सर्वाधिक पुढे आहे. पुण्यात 2016 मध्ये मुलींचे प्रमाण 845 एवढे होते; तर 2017 मध्ये हे प्रमाण 63 अंकांनी वाढल्याने 908पर्यंत प्रमाण पोहोचले. त्यामुळे राज्यात एक हजार मुलांच्या जन्मामागे मुलींचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक ठरले. दुसरीकडे, पुण्याजवळील कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, परभणी, हिंगोली, बीड, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 2017 मध्ये घसरल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. ही बाब राज्याच्या दृष्टीने चिंतेची आहे.

नागरिकांमध्ये जागृती वाढली
गर्भलिंग प्रसूतीपूर्व निदान व प्रसवपूर्व तंत्र (पीसीपीएनडीटी) या कायद्याची आरोग्य खात्याकडून झालेली प्रभावी अंमलबजावणी, त्याबाबत नागरिकांमध्ये वाढलेली जागृती, तसेच राजकीय इच्छाशक्तीमुळे मुलींच्या जन्माचे प्रमाण महाराष्ट्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत 9 अंकांनी वाढले आहे. 2010 च्या तुलनेत हे प्रमाण 59 अंकांनी वाढले आहे.