‘महाराष्ट्र वार्षिकी 2017’ सर्व वयोगटातील नागरिकांना उपयुक्त

0

धुळे । माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिध्द केलेला ‘महाराष्ट्र वार्षिकी 2017’ अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल,असे प्रतिपादन जिल्हा अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयतर्फे प्रसिध्द केलेल्या ‘महाराष्ट्र वार्षिकी 2017’ या ग्रंथाची प्रत जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांना भेट म्हणून दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त के.जी.बागूल उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी राजपूत यांनी सांगितले, राज्य शासनाच्या विविध विभागांची सविस्तर माहिती, विभागांचे उद्देश व कार्य, रचना, महत्त्वाच्या योजना, संपर्क क्रमांक व मंत्रीमंडळ निर्णय, महत्त्वाच्या शासकीय घटना, घडामोडी, उपक्रम, कार्यक्रम, पुरस्कार, महाराष्ट्राची मानचिन्हे, महाराष्ट्रातील भारतरत्न व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर, राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपाल तसेच विधिमंडळ सदस्य आणि केंद्रीय व राज्य मंत्रीमंडळ, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान, राज्यातील लोकसभा व राज्यसभा सदस्य यांचाही समावेश आहे. या ग्रंथाची किंमत 300 रुपये असून जिल्हा माहिती कार्यालय, धुळे येथे तो उपलब्ध आहे.

वस्तुनिष्ठ माहितीचा समावेश
जिल्हाधिकारी म्हणाले, महाराष्ट्र वार्षिकी 2017 हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, शासकीय-निमशासकीय कार्यालये, अभ्यासक, ग्रंथालये, पत्रकार, राजकीय नेते, सामान्यज्ञानाची आवड असणारे सर्व वयोगटातील नागरिक यांना उपयुक्त आहे. या पुस्तकामध्ये महाराष्ट्रा विषयी अधिकृत, वस्तुनिष्ठ व एकत्रित माहितीचा समावेश आहे. महाराष्ट्राची भूमी आणि लोक, राज्याची भौतिक वैशिष्ट्ये, भौगोलिक स्थिती, इतिहास, वन्यजीवन, संस्कृती, महाराष्ट्राविषयी सांख्यिकी स्वरुपाच्या बाबी, पर्यटन, उद्योग, शिक्षण,आरोग्य, आदी माहितीचा समावेश आहे.