महाराष्ट्र शासनाची मुल्यमापन परीक्षा बिनकामाची !

0

मुंबई (प्रतिभा घडशी): महाराष्ट्र शासनाच्या नैदानिक चाचणी परीक्षेबाबत महाराष्ट्रातील जवळजवळ महाराष्ट्रातील सर्वच शाळातील शिक्षकांनी रोष दर्शवला आहे. परीक्षेबाबत कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक मेलद्वारे शासनाने नैदानिक परीक्षेबाबत शाळांना कळवणे हा कसला प्रकार आहे, असा सवाल अनेक शाळेच्या शिक्षकांनी विचारला आहे. मुळात महाराष्ट्र शासनाच्या नैदानिक चाचणी परीक्षेला आमचा आक्षेप असून याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काहीही उपयोग नाही त्यामुळे ही परीक्षा बिनकामाची आहे असा जळजळीत रोष अनेक शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केला आहे. शिक्षक भारती संघटनेने याची नोंद घेत शिक्षण विभागाला मेलद्वारे याचा जाब विचारला आहे.

शिक्षक भारती संघटनेचा आक्षेप
मुंबईतील अनेक शाळा दुबार अधिवेशनात भारत असल्याने एकाच वेळी दुसरी ते नववी पर्यंतच्या तुकड्यांची परीक्षा घेण्याबाबतचे पत्रक शिक्षक विभागाने जाहीर केले आहे. यामुळे 18 व 19 ऑगस्टला होणार्या चाचण्यांचे आयोजन करताना शासन व शाळांनाच परीक्षा द्यावी लागणार आहे अस म्हणत शिक्षक भारती संघटनेने या पत्रकावर आक्षेप घेतला आहे.

परीक्षेचे स्वरूप अमानसशास्त्रीय
येत्या 18 आणि 19 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी तर त्याचबरोबर नववीच्या विद्यर्थ्यांची नैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचण्या सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना चार विषयांची म्हणजेच परंतु लहान मुलांना एकाच दिवशी दोन पेपर द्यायला लावणे हे अमानसशास्त्रीय आहे. तसेच पेपच्या दिवशी मुलांना सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 म्हणजे 7 तास शाळेत थांबावे लागणार आहे. हा प्रकार म्हणजे मुलांना आणि पालकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे शाळांच्या मुख्याध्यापाकांचे म्हणणे आहे. मुंबईतील 1500 शाळांचा यात समावेश आहे. यावर शिक्षक भरतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी आक्षेप घेतला आहे.

वाढती पेपरफुटी
मागील दोन वर्षापासून होत असलेल्या या पायाभूत चाचण्यांच्या पेपरफुटीला रोखण्यात शिक्षण विभागाला अपयश आले आहे. पेपरपूर्वीच प्रश्नपत्रिका मुलांच्या हाती लागतात. जवळच्या झेरोक्स दुकानात 50 रुपये प्रत प्रमाणे त्या विकल्या जातात. मुल घोकंपट्टी करून पेपरची पैकीच्या पैकी गुण मिळतात. चाचणीनंतर विद्यार्थ्यांना प्राप्त होणात्या गुणाच्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने शाळांना कराव्या लागतात. याच मुलांना शाळांनी काढलेल्या पेपरमध्ये कमी गुण मिळतात शासनातर्फे बाह्य यंत्रणेद्वारे तपासणी दरम्यान ही तफावत दिसून आल्यास पुन्हा शिक्षक व शाळेला जबाबदार धरण्यात येणार आहे. अश्या वेळी पेपर फुटी रोखणार कशी असा सवाल शिक्षक भारतीने शिक्षण विभागाला विचारला आहे.

काय आहे नैदानिक चाचणी परीक्षा
विद्यार्थी पुढील इयत्तेत जात असतांना त्याचा मागील वर्षाचा अभ्यात कितपत झाला आहे ते पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांची नैदानिक परीक्षा घेण्यात येते. दोनवर्षपूर्वीपासून शासन हा परीक्षेचे आयोजन करत आहे. गेल्यावर्षी या परीक्षेसाठी फक्त मराठी आणि गणित अशा 2 विषयांचा समावेश करण्यात आला होता. मात्र यंदा या परीक्षेत आणखी दोन विषयांचा समावेश करून मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी अशा चार विषयांची मिळून परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र शासनाची ही परीक्षाच मुळात आम्हाला मान्य नाही. ह्या परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काहीही उपयोग होत नाही. परीक्षेचे पेपर आधीच दिलेले असतात. त्यामुळे विद्यार्थी ते पेपर झेरोक्स काढून त्याचा अभ्यास करतात आणि सहज पास होतात. त्याच प्रमाणे आम्हाला या नवीन परीक्षेबाबत काही प्रशिक्षण देखील देण्यात आलेले नाही.
– अंकुश महाडिक,
मुख्याध्यापक, डी. एस. हायस्कूल, सायन

एकाच दिवशी दोन पेपर ठेवले असल्याने शाळेने परीक्षेचे नियोजन कसे करायचे, हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. मुळातच 17 तारखेला पारसी नवीन वर्षानिमित्त शाळेला सुट्टी असल्याने शाळेसमोर 18 आणि 19 च्या परीक्षेसंदर्भातील पेच प्रसंग आमच्यासमोर उभा केला आहे.
– लीना कुलकर्णी,
उप मुख्याध्यापक, डॉ. अन्तोनिओ दा सिलवा हायस्कूल, दादर

शिक्षण विभागाला पाठवण्यात आलेल्या मैलचे उत्तर आम्हाला प्राप्त झाले असून त्यांनी या वेळापत्रकात बदल करून नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करू असे सांगितले आहे.
– सुभाष मोरे,
कार्याध्यक्ष, शिक्षण भारती संघटना