पुणे । श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भारतातील गणेशोत्सवाचे खरे जनक असून, लोकांना खोटा इतिहास सांगू नये. यंदा गणेशोत्सवाला 126 वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त भाऊसाहेब रंगारी यांच्या नावाने उत्सव जाहीर करून पुरस्कार जाहीर करावेत, यासाठी भाऊसाबेह रंगारी ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र शासनाला व पुणे महानगरपालिकेला कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.
…अन्यथा उच्च न्यायालयात जाणार
भारतातील पहिला सार्वजनिक व मानाचा गणपती भाऊ रंगारी असल्याचा दावा भाऊ रंगारी ट्रस्ट करीत आहे. या प्रकरणाचा निकाल 10 दिवसात जाहीर करावा, अन्यथा उच्च न्यायालयात दावे दाखल करण्यात येतील, अशी माहिती, भाऊसाबेह रंगारी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी दिली.
गणेश उत्सवाचे जनक
भाऊरंगारी यांनी 1892 साली पुढाकार घेऊन ब्रिटीशांच्या विरोधात लढ्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव बुधवार पेठेतील सरदार इचलकरंजीकर वाडा येथे सुरू केला, असा उल्लेख महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी चरीत्र कोश खंड 3 मध्ये दिलेला आहे. भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेश उत्सवाचे खरे जनक व संस्थापक आहेत. हे महाराष्ट्र शासन व पुणे मनपाने जाहीर करावे, अशी मागणी ट्रस्टने केली आहे.
10 दिवसांत निर्णय द्या
गणेश उत्सवाचे यंदा 126 वे वर्ष चालू आहे असेही मनपाने जाहीर करावे. चुकीचा इतिहास समाजापुढे जावू नये त्यासाठी शासनाने इतिहास तज्ज्ञांची तसेच गणेश मंडळातील जुन्या मंडळींची बैठक बसवून येत्या 10 दिवसामध्ये निर्णय घेण्यात यावा, अन्यथा उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली जाईल. या प्रकरणी पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार, महापौर मुक्ता टिळक, विरोधी पक्ष नेते, गटनेते, पोलिस आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष यांना नोटीस देण्यात आल्या आहे.