मुंबई- केंद्र शासनाच्या स्थावर संपदा (विनियमन व विकास) अधिनियमनाचा वापर राज्यात प्रभावीपणे करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची (महारेरा) स्थापना केली असून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी गौतम चॅटर्जी यांची नेमणूक केली आहे.
याचबरोबर शासनाने डॉ. वि. एस. सिंह आणि बी. डी. कापडणीस यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची राज्यात अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाचे अध्यक्ष व मुंबई येथील प्राधिकरणाच्या कार्यालयासाठी दोन पूर्णवेळ सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असे शासनाने म्हटले आहे.
ई. रविंद्रन यांची बदली
राज्यशासनाने गुरूवारीही काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त ई. रविंद्रन यांची नवी मुंबईत कौशल्य विकास आयुक्त म्हणून नेमणूक कहरण्यात आली आहे. नाशिकच्या कळवण येथील सहाय्यक जिल्हाधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी गंगाथरन डी. यांची धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांची अकोल्यात राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्य बियाणे महामंडळाचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बाकोरिया यांची औरंगाबाद येथे महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुण्यातील महाराष्ट्र कृषि स्पर्धात्मक प्रकल्पाचे प्रकल्प संचालक संपदा मेहता यांची मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.