कोल्हापूर । कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील पुजार्यांनी पंढरपूरच्या मंदिराप्रमाणे याही मंदिराचा कारभार व्हावा, अशी मागणी केली आहे. पंढरपूरच्या पुजार्यांना जसे सरकारी नोकर म्हणून गणले जाते, तसेच कोल्हापूरच्या मंदिरातील पुजार्यांनाही सरकारी नोकर म्हणून दर्जा मिळावा, अशी मागणी इथल्या पुजार्यांनी केली आहे. या मागणीसाठी ते मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शाहू महाराजांच्या वटहुकूमाची साक्ष
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील पुजार्यांनी ही मागणी करताना छत्रपती शाहू महाराजांनी काढलेल्या वटहुकूमाची साक्ष काढलेली आहे. करवीर निवासी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरातील पुजारी हे सरकारी नोकर आहेत, त्यांना तेथील उत्पन्न घेण्याचा अधिकार नाही, अशा आशयाचा वटहुकूम करवीरनगरीचे तत्कालिन छत्रपती शाहू महाराज यांनी 14 मे 1913 ला जारी केला होता. या वटहुकूमाच्याआधारेच आत्ताचे पुजारी हे पंढरपुरातील पुजार्यांप्रमाणे सरकारी नोकर मानले जावेत, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली जाणार आहे. धर्मतत्वज्ञानाचे अभ्यासक सुभाष देसाई, सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट व शिल्पकार अशोक सुतार यांनी कोल्हापूरात घेतलेल्या पत्रकार परिषेदेमध्ये ही माहिती दिली आहे.
काय होता वटहुकूम?
छत्रपती शाहू महाराजांच्या वटहुकूमाचा संदर्भ देऊन सुभाष देसाई पुढे म्हणाले की, या मंदिरात जमा होणारी देणगी, रक्कमेचा विनियोग हा भक्तांसाठी धर्मशाळा, पाण्याची व्यवस्था, तसेच शैक्षणिक कामासाठी केला जावा, असे म्हटले होते. एवढेच नाही तर मंदिरात जमा होणार्या देणगीपैकी 10 रुपयेपर्यंतची रक्कम पुजार्यांनी घ्यावी व उर्वरित दागिने, शालू सरकारला जमा करावे, असे म्हटले होते.
आता पालकमंत्र्यांकडून अपेक्षा
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाबत मध्यतंरी असाच वाद निर्माण झाला होता. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मंदिरातील पुजारी बडवे यांना हटवून आपल्या अखत्यारित नवीन पुजारी नियुक्त केले. आता हे पुजारी सरकारी नोकर आहेत. दोन वर्षांपूर्वीच्या या निकालाचा संदर्भ घेऊन कोल्हापुरातील अंबाबाईचे भक्त व सामाजिक संघटनांनी उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. महालक्ष्मी मंदिरातील सध्याच्या पुजार्यांचे मालकीहक्क काढून घेऊन लायक पुजारी नियुक्त करावेत, अशी मागणी देखील केली जाणार आहे. या प्रश्नांत पालक व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालून जनतेच्या भावनांचा आदर करून बदल घडवून आणावा, अशी अपेक्षा ही व्यक्त करण्यात आली.