महालक्ष्मी मंदिरात देवीची प्राणप्रतिष्ठा

0

पुणे । सनई चौघड्यांच्या निनादात, मंगलमय वातावरणात, धूप, अगरबत्तीचा दरवळणार्‍या सुगंधात आणि ‘जय माता दी, उदे गं अंबे उदे’ अशा जयघोषात आणि मंगलमय वातावरणात शहरातील विविध मंदिरे आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. तर नवरात्रोत्सव मंडळांनी देवीची प्राणप्रतिष्ठापना करून शारदीय नवरात्रोत्सवास गुरुवारपासून प्रारंभ झाला. सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात श्री गोविंद गिरीराजजी महाराज (आचार्य किशोर व्यास) यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यावेळी संस्कार चॅनेलचे प्रमुख कृष्णकुमारजी पित्ती, मंदिराचे विश्वस्त राजकुमार अग्रवाल आदी उपस्थित होते.

घटस्थापनेसाठी मुहूर्त सकाळचा असल्यामुळे घट बसविण्यासाठी घरोघरी लगबग सुरू होती. दीपमाळांसह वैविध्यपूर्ण फुलांची आरास आणि रोषणाईने मंदिरे सजविली होती. महिलांनी देवीची खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही मंदिरांच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.