महाळुंगेतील हुतात्मा बाबू गेनू स्मारकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

0

आंबेगाव । महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मारकातील दीपस्तंभाची दुरवस्था झाली असून त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे दीपस्तंभ कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ याठिकाणी क्रांतिवीर हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. शासकीय निधीनुसार याठिकाणी शुशोभिकरण व उद्यान बनवले आहे. मात्र, येथील बांधकाम करताना ते व्यवस्थित न केल्याने दीपस्तंभ व काही ठिकाणचे बांधकाम मोडकळीस आले आहे. ठेकेदार व अधिकार्‍यांनी बांधकामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केल्याने असे निकृष्ट बांधकाम झाल्याचा आरोप करत अशा भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दीपस्तंभाची होणारी विटंबना थांबविण्याची मागणी
क्रांतिकारकाच्या स्मारकाकडे लक्ष देण्यासाठी प्रशासकीय आणि शासन स्तरावर वेळ नाही. या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी नागरिक पाठपुरावा करीत आहेत. याबाबत तहसील कार्यालयात व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करून देखील या दीपस्तंभाची कोणतीही देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही. स्मारकसमितीचे देखील याकडे लक्ष देत नाही. हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, अनिल पडवळ यांनी वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन सुस्तच आहे. स्मारक जवळील दीपस्तंभाची विटंबना होत असून लवकरात लवकर दीपस्तंभ दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.