महाळुंगेत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर

0

चाकण : उद्योगाची पंढरी मानल्या जाणार्‍या श्री क्षेत्र महाळुंगे येथे वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक व प्रवासी हैराण झाले आहेत. महाळुंगे येथील बस स्थानकाच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून वाहतूकपोलीस कर्मचार्‍याची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत वाढत्या कारखानदारीमुळे कामगारांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाढत्या नागरिकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्यादेखील उद्भवली आहे. महाळुंगे येथे श्रीपती महाराज बाबांचे देवस्थान असून, औद्योगिक कारखान्यांमुळे येथे नेहमीच कामगारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सिग्नल यंत्रणेअभावी ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे धोक्याचे झाले आहे. वाहतुकीवर कसल्याच प्रकारचे नियंत्रण नसल्याने वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवून अपघातांना निमंत्रण देत आहेत.

वारंवार होते वाहतूक कोंडी
वारंवार होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करून पोलीस प्रशासनाने वाघजाईनगर फाटा, महाळुंगे गावाच्या मुख्य चौकात, एमआयडीसी चौकात, एचपी चौकात, खालूंब्रे येथील ह्युंदाई चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्याबरोबरच संबंधित ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांची कायमस्वरुपी नियुक्ती करावी, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती अमोल पवार, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजीराजे वर्पे, बाजार समिती संचालक चंद्रकांत इंगवले, उद्योगपती विजय बोत्रे, शंकर बोत्रे, गणेश बोत्रे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख विनोद महाळुंगकर पाटील, माजी उपसरपंच सुनील मिंडे यांनी केली आहे.