चाकण : महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील टेकड वस्तीवरील घरावर अज्ञात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये दोन तोळ्यांची सोन्याची चेन व रोख 15 हजार रुपये चोरून पोबारा केला. दरम्यान, चोरट्यांच्या हल्ल्यात घरमालक ठार झाले. शिवाजी गुलाबराव शिवळे (वय 50, रा. महाळुंगे इंगळे, ता.खेड, जि.पुणे) असे त्यांचे नाव आहे. शनिवारी पहाटे ही घटना घडली.
पहाटेची घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना महाळुंगे येथील टेकड वस्तीवर शुक्रवारी (दि. 8) रात्री 11 ते शनिवारी (दि. 9) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद कमलाकर विलास शिवळे (वय 30, रा. महाळुंगे, ता.खेड, जि.पुणे ) यांनी दिली आहे. चोरट्यांनी घराचे ग्रिलचे दरवाज्याचे कुलूप कशाने तरी तोडून आत प्रवेश केला कपाटातील कपडे अस्ताव्यस्त फेकून दागिने व रोख रक्कम लंपास केली. व कशाने तरी डोक्यात मारून शिवाजी शिवळे यांना गतप्राण केले. पोलीस उपविभागीय अधिकारी राम पठारे यांनी घटना स्थळी तातडीने भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार हे पुढील तपास करीत आहेत.