चाकण : खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथून दोन वेगवेगळ्या घटनेत दोन दुचाकी चोरीस गेल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातही दुचाकी चोरीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
हॅण्डल लॉक तोडून चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत, प्रकाश तुकाराम भगत (वय 27, रा. महाळुंगे, इंगळे. मूळ रा. कळंबा बोडके, जि. वाशिम) यांची (एमएच 37, पी 3654) क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. ही घटना 30 जुलै रोजी सायंकाळी पाच ते 31 जुलै रोजी रात्री दीडच्या दरम्यान घडली. दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर भगत यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुसर्या घटनेत, सौदागर आत्माराम ननवरे यांची (एमएच 14 इक्यू 9694) क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणीही चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सातकर पुढील तपास करीत आहेत.