महाविकास आघाडीचे १६२ आमदार एकत्र; ग्रँड हयातमध्ये मुक्काम !

0

मुंबई: अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने राज्यातील राजकारणाला नवीन वळण लागले आहे. दोन दिवसांपासून राजकारण अजित पवार यांच्याभोवती फिरत आहे. अजित पवारांनी पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा विराजमान झाले आहे. दुसरीकडे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेचा दावा सोडलेला नाही. भाजपला विश्वासदर्शक ठरावात पराभव करण्याची पूर्ण तयारी महाविकास आघाडीतर्फे होत आहे. परंतु महाविकास आघाडीला आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवावे लागत आहे. आता महाविकास आघाडीचे १६२ आमदार आज संध्याकाळी ग्रँड हयात या हॉटेलमध्ये जमणार आहे. या हॉटेलमध्ये १६२ आमदारांची उपस्थिती असेल. आम्ही १६२ असा एक मेसेज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला.

रेनेसाँ या हॉटेलमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना हलवण्यात आले आणि ग्रँड हयात या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तर शिवसेनेचे सगळे आमदार हे हॉटेल ललित या ठिकाणी वास्तव्यास आहेत. काँग्रेसनेही त्यांचे आमदार जयपूर आणि भोपाळला नेले आहेत. आत आज संध्याकाळी सगळे म्हणजेच १६२ आमदार ग्रँड हयातमध्ये जमणार आहेत. महाविकास आघाडीची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील यावरही सहमती झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. मात्र शनिवारची सकाळ उजाडली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. कारण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत शपथ घेतली.