महाविकास आघाडीच्या बैठकीत कॉग्रेसची दांडी

0

कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील, अॅड. रवींद्र पाटील यांची जि.प सदस्यांसोबत चर्चा

जळगावः जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड उद्या 3 जानेवारीला होत आहे. सध्या जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे. महाविकास आघाडीकडून तसे प्रयत्न देखील केले जात आहे. त्याचसंदर्भात बुधवारी 1 जानेवारीला शिवसेनेचे संपर्क प्रमुख डॉ.संजय सावंत, नवनियुक्त कॅबीनेट मंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार अनिल पाटील यांची अंजिठा विश्रामगृह येथे संयुक्त बैठक झाली. यात महाविकास आघाडी यशस्वी करण्यावर चर्चा झाली. मात्र कॉग्रेसने या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या यशाबाबत शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषदेवर सत्तांतर होणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करत आहे.

जि.प.सदस्यांसोबत चर्चा

अजिंठा विश्रामगृहात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. जि.प.सदस्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन वस्तुस्थितीची चाचपणी करण्यात आली. जिल्हा परिषदेत सत्तांतर व्हावे यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीकडून प्रयत्न होतांना कॉग्रेसच्या भूमिकेमुळे त्याला खिळ बसणार आहे.

कॉग्रेस भाजपसोबत

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी एकच दिवस शिल्लक राहिले असतांना कॉग्रेसने महाविकास आघाडीसोबत जाण्यास कोणत्याही प्रकारची सकारात्मक भुमिका घेतलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादीला कॉग्रेस सोबतच असल्याचा विश्वास आहे. मात्र कॉग्रेस मागील निवडणूकीप्रमाणे यंदाही भाजपसोबतच राहणार असल्याचे दिसून येते. कॉग्रेसचे चारही सदस्य भाजपसोबत असून त्यांना भाजपकडून सहलीवर पाठविण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते.

अध्यक्ष, उपाध्यक्ष आमचाच – गुलाबराव पाटील

बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे सर्व सदस्य एकत्रित आहेत. त्यामुळे 3 रोजी जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आघाडीचाच होईल. सध्या संख्याबळ दिसत नसले तरी योग्यवेळ आल्यावर ते आमच्याकडे उपलब्ध होईल असाही दावा गुलाबराव पाटील यांनी केला. तसेच जि.प. असो वा पंचायत समितीची निवडणूक आता सर्वच निवडणूका या मविआसोबतच लढविण्यात येतील असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी होणार्‍या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, व शिवसेना यांची महाविकास आघाडी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी कॉँग्रेसच्या चारही सदस्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांनी पक्षाच्या वतीने पक्षादेश (व्हीप)बजाविला आहे.यात प्रभाकर सोनवणे, अरुणा आर.पाटील, दिलीप पाटील, सुरेखा नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून हा व्हीप बजावण्यात आला आहे. जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जयश्री पाटील यांना मतदान करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या व्हीपचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 व नियम 1987 चे तरतुदीनुसार कारवाई करण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदेशाचे काटेकोर पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांनी कळविले आहे.