महाविकास आघाडीला धक्का : पंढरपुरात भाजपाकडून ‘करेक्ट’ कार्यक्रम

पंढरपूर: पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार भगीरथ भालके यांना ३ हजार ७३३ मतांनी पराभूत केले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला आणि विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे करोना संसर्गाने निधन झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर विधान परिषद निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका आणि जिल्हा पातळीवरील निवडणुकांत महाविकास आघाडीचाच दबदबा पाहायला मिळत होता. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या एकजुटीने भाजपपुढे मोठे आव्हान उभे ठाकले होते व भाजपच्या पराभवांची मालिकाच लागली होती. पंढरपुरात मात्र यापेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळाले असून राष्ट्रवादीला आपला गड गमवावा लागला आहे. भाजपने समाधान अवताडे यांच्या रूपाने येथे तगडा उमेदवार दिला होता आणि भाजपची ही खेळी यशस्वी ठरली आहे.