जळगाव – राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्ता समिकरणाने शत्रुला मित्र आणि मित्राला शत्रु बनविले. जळगाव जिल्ह्यातील प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या जळगाव ग्रामीणची लढत राज्यासाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरायची. कारण या मतदारसंघात शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर हे दोन्ही मातब्बर नेते एकमेकांच्या विरोधात निवडणुक लढले. या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडायच्या. एकमेकांना दिवसरात्र पाण्यात पाहणारे हे दोन्ही नेते आज राजकीय तडजोडीमुळे विरोध बाजूला ठेऊन शिवजयंतीनिमित्त चक्क फुगडी खेळतांना दिसले. दोन्ही गुलाबरावांनी खेळलेली ही फुगडी आगामी निवडणुकीत कशी रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.