गटप्रमुख नाना पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव: आगामी एप्रिल-जून महिन्यात होणार्या ग.स.सोसायटीच्या निवडणुकीत सभासदांच्या हितासाठी महाविकास गट निवडणूक रिंगणात उतरणार असून सर्वच जागांवर 21 उमेदवार देण्यात येणार असून पात्र उमेदवार निवडीसाठी पाच जणांची कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे, अशी माहिती महाविकास गटाचे प्रमुख नाना पाटील यांनी जळगावात पत्रकार परिषदेत दिली.
महाविकास गटाची बैठक रविवारी जळगाव येथे झाली. या बैठकीत आगामी होणार्या ग.स.सोसायटी, भुसावळ शिक्षक पतपेढी त्याचबरोबर पारोळा शिक्षक पतपेढी निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली. ग.स.सोसायटी आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असून जवळ जवळ 38 ते 40 हजार सभासद आहे. पण विद्यमान संचालक मंडळाने सभासद हितापेक्षा स्वहित जास्त जोपासले. एवढी मोठी संस्था असताना इतर संस्थेपेक्षा कर्ज मर्यादा कमी आहे. कर्जावर व्याजदर जास्त आहे. डिव्हिडंड कमी दिला जातो. फक्त 1200 सभासद असलेली संस्था यांची कर्ज मर्यादा 10 लाख रु. आहे. जामिन आणि विशेष मिळून जामिनकी कर्जावर व्याज 8 टक्के, विशेष कर्जावर व्याज 9 टक्के आणि वर्गणीवर 7 टक्के व्याज दिले जाते. त्याचबरोबर यावर्षी त्या संस्थेने 15टक्के डिव्हिडंट वाटप केले. कारण त्या खाजगी प्राथमिक संस्थेच्या संचालक मंडळ हे सभासद हितासाठी काम करते. स्वहितासाठी नाही. 40 हजार सभासदांची संस्था आणि 111 वर्षांची परंपरा असलेली ग.स. सोसायटी या विद्यमान संचालक मंडळामुळे ग.स.सभासदांचे नुकसान झाले. सभासदांचे हित कमी आणि संचालकांचे स्वहित जास्त झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
प्रशासक बसवल्याने त्या निर्णयाचे स्वागत
महाविकास गटासोबत ज्यांना ज्यांना यायचे आहे. या पर्यायावर पण विचार करण्यात आला. सभासद हितासाठी महाविकास गटाने शिक्षक,महसूल, ग्रामसेवक, तलाठी या सर्व विभागातील कर्मचारी, संघटना यांच्याशी चर्चा करणार आणि महाविकास गटाचा अजेंडा तयार करताना डि.सी.पी.एस.धारक सभासदांसाठी काय करता येईल. हे त्यांच्याशी आम्ही चर्चा करु. जेणेकरून डीसीपीएसधारक बांधव यांना मदत होईल. त्याचबरोबर सभासदांसाठी स्वतंत्र विमा योजना लागू करण्याचे प्रयत्न करू, जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी ग.स. सोसायटी जळगाव कार्यकारी मंडळ बरखास्त करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांनी संस्थेवर प्रशासक बसवल्याने त्या निर्णयाचे स्वागत महाविकास गटाने केले आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी महाविकास गटाचे ईश्वर सपकाळे, नाना पाटील, संदिप पवार, राधेशाम पाटील, नरेंद्र सपकाळे, राजेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश बोरसे (धरणगाव), संदिप पाटील (यावल), सचिन सरकटे (एरंडोल), अनिल चौधरी (पारोळा), चंद्रशेखर साखुंखे (चोपडा), नंदु पाटील (पारोळा), रोशनकुमार साळुंखे मुक्ताइनगर आदि उपस्थित होते.