पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत असतानाच आणि रोखरहित व्यवहाराला प्रोत्साहन देत असताना महावितरण कंपनीने मात्र, मोदींच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचे काम चालवले आहे. एक तर ग्राहकांना वेळेवर बिले दिले जात नाहीत, त्यातच डिजिटल पेमेंट केल्यानंतरही वीजबिल भरणात त्रुटी राहतात आणि वेळोवेळी तक्रारी करुनही त्याकडे कानाडोळा केला जातो. त्यामुळे ग्राहकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबतची एक तक्रार नुकतीच दैनिक ‘जनशक्ति’स प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे, हीच तक्रार महावितरणचे उपविभागीय अभियंता यांनादेखील देण्यात आली होती. तथापि, त्यांनी नेहमीप्रमाणे कानाडोळा करण्याचेच काम केले.
सेनेतील सेवानिवृत्त अधिकार्याला मनस्ताप
सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कमांडंट म्हणून सेवानिवृत्त झालेले एस. एस. रानडे यांना महावितरणच्या तुघलकी कारभाराचा सद्या जोरदार त्रास होत आहे. रानडे हे डिजिटली महावितरणचे बिल भरत असतानादेखील त्यांच्याकडून नाहक दंड आकारण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे. तसेच, त्यांना महावितरणचे वीजबिलदेखील वेळेवर मिळत नाही. रानडे यांचे वीजबिल हे एचडीएफसीच्या ‘स्मार्ट-पे इसीएस’द्वारे भरले जाते. तथापि, त्यांना बिल भरल्याची पावती महावितरणकडून उशिरा मिळते. त्यामुळे त्यांना जास्तीची रक्कम मोजावी लागत आहे.
महावितरणच्या कारभारात सुधारणा नाहीच
तसेच, रानडे हे एचडीएफसी स्मार्टपे इसीएसद्वारे सद्या बिल भरत असताना त्यांच्या बिलावर कॉसमॉस बँकद्वारे बिल भरले गेल्याचे दाखवले जाते. तसेच, पीसीएनडीटी, निगडी येथील पिनकोड क्रमांकही या बिलावर बदलून येत नसल्याची तक्रार रानडे यांनी केली आहे. याबाबतच्या तक्रारी करुनही महावितरणच्या कारभारात काहीही सुधारणा होत नसल्याची गंभीर तक्रार रानडे यांनी केली आहे.
दिव्याखाली अंधार
केंद्र व राज्य सरकार हे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी महावितरण, दूरध्वनी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या सेवांसह सर्व सरकारी कर व इतर देयके हे डिजिटल व्यवहारांद्वारे देण्यात यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः पुढाकार घेऊन लोकांना आवाहन करत आहेत. त्यासाठी विविध योजनाही सरकारने काढल्या आहेत. परंतु, दिव्याखाली अंधार याप्रमाणे महावितरणचा कारभार दिसून आला आहे. डिजिटली व मुदतपूर्व बिल भरूनही दहा रुपये जादा आकारले जात असून, त्याचा हजारो ग्राहकांना नाहक भूर्दंड पडत आहे. महावितरणने तातडीने आपल्या कारभारात बदल केला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही एस. एस. रानडे यांनी दिला आहे.