येरवडा । विश्रांतवाडी महावितरण उपकेंद्राअंतर्गत येणार्या वाढीव वीजबिलामुळे विश्रांतवाडीकर हैराण झाले असून याबाबत वारंवार महावितरण अधिकारी यांना तक्रार करून ही अधिकारी यावर कोणतेच ठोस पावले उचलत नसल्याने अधिकार्यांचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. विश्रांतवाडी येथे उपकेंद्र उभारून त्या अंतर्गत धानोरी, कळस या भागात उपकेंद्र उभारण्यात आले आहे. मात्र असे असताना देखील नागरिकांना अनेक समस्येला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे महावितरण अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहे. रिडिंग व वीजबिल वाटप करणारे कामगार देखील अधिकार्यांच्या जवळचे असल्यामुळे संबंधित अधिकारी हे कामगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्राहकाकडून होत आहे. विश्रांतवाडी उपकेंद्रात विजेच्या तक्रारी संबंधात वीज ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
जर ग्राहकांच्या समस्यांचं जर वेळेत सुटत नसतील तर नागरिकांच्या सुविधेसाठी महावितरणच्या वतीने लाखो रुपये खर्च करून देखील उभारण्यात आलेल्या कार्यालयांचा उपयोग काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यातच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिना दोन महिन्यापूर्वी अधिकारी व वीज ग्राहकांच्या बैठक सभा व तक्रार निवारण केंद्र उभारून नागरिकांनी असलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिले होते. मात्र दीड ते दोन महिने उलटून देखील जर अधिकारी समस्या सोडविण्यास असमर्थ ठरत असतील तर घेतलेल्या सभा ह्या पाण्यातच गेल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत असून कर्मचारी व अधिकारी हे जनतेची फसवणूक करून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप मराठवाडा विकास महासंघटनेचे अध्यक्ष भालचंद्र कसबे यांनी केला आहे. तरी नागरिकांच्या मुख्य समस्या सोडविण्यासाठी महावितरण विभागाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आंदोलनाचा इशारा
वीजबिलाबाबत नागरिकांच्या अनेक समस्या असून त्या सोडविण्यात याव्यात याकरिता मराठवाडा विकास महासंघटनेच्या वतीने अतिरिक्त सहायक अभियंता संजय घोडके व कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांना निवेदन देण्यात येणार असून जनतेचे प्रश्न न सुटल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू.
– भालचंद्र कसबे, मराठवाडा विकास महासंघटना