महावितरणची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत!

0

प्रलंबित विषयांबाबत झालेल्या आढावा बैठकीत आमदार महेश लांडगे यांच्या सूचना

भोसरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच नवीन ग्राहकांना वीज मीटर तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावे, सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या आहेत. भोसरी विधानसभा विद्युत समितीची पहिलीच आढवा बैठक भोसरीत पार पडली. समितीचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता तथा समितीचे सह अध्यक्ष मदन शेवाळे, नगरसेवक व समितीचे सदस्य राहुल जाधव उपस्थित होते.

कुंदन गायकवाड, राजेंद्र लांडगे, विकास डोळस, सागर गवळी, उत्तम केंदळे, नगरसेविका व सदस्या सारिका बोर्‍हाडे, सोनाली गव्हाणे, अश्‍विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, उपविभागीय अभियंता बापूराव भरणे, ग्राहक प्रतिनिधी मच्छिंद्र दरवडे, परिक्षित वाघेरे, निलेश भालेकर, राहुल शिंदे, सम्राट भागवत, अशासकीय प्रतिनिधी सुहास ताम्हाणे बैठकीला उपस्थित होते.

वीजमीटर त्वरीत उपलब्ध करावे
आमदार लांडगे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीमध्ये येत्या 2018-19 मध्ये घेण्यात येणार्‍या कामाचा आराखडा तयार करणे, भोसरी मतदार संघातील नागरिकांचे विद्युत विभागाशी असलेले प्रलंबित प्रश्‍न सोडविणे, नवीन ग्राहकांना वीज मीटर लवकरात-लवकर उपलब्ध करुन देणे, महाविरतणच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे, नवीन प्रस्ताव तत्काळ मंजुर करुन घेऊन कामे सुरु करावीत. कामासाठी येणार्‍या नागरिकांशी सहकार्याने वागून त्यांचे काम त्वरीत पूर्ण करून द्यावे. त्यांच्या समस्यांना लवकरात लवकर मार्गी लावले गेले पाहिजे. आज-उद्या असे न करता त्वरीत काम पूर्ण होईल याकडे महावितरणच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी लक्ष दिले पाहिजे.

यावेळी समितीच्या सदस्यांच्या भागातील तक्रारींचा आढावा घेण्यात आला. तसेच पुर्ण झालेली कामे व प्रस्तावित कामांचा यासह इतर प्रलंबित विषयांबाबत आमदाल लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. विविध योजनांतील पूर्ण झालेली, प्रगतीपथावर असलेली व प्रस्थापित कामे आदी विविध महत्वपूर्ण विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

भोसरी विभागांतर्गत आकुर्डी, भोसरी व प्राधिकरण हे तीन उपविभाग असून या तीन उपविभागात संभाजीनगर, चिंचवड, मोशी, भोसरी, नाशिक रोड, चर्‍होली, निगडी, प्राधिकरण, देहूरोड, देहूगाव आणि तळवडे अशा नऊ शाखा कार्यालय आहेत. भोसरी विभागात सध्या 538 उच्चदाब, दोन लाख 11 हजार 751 घरगुती, 23 हजार 723 व्यापारी, 11 हजार 477 औद्योगिक, 1 हजार 649 शेती व 1 हजार 212 इतर असे एकूण दोन लाख 49 हजार 812 वीज ग्राहक आहेत. या सर्व वीज ग्राहकांना चिंचवड, भोसरी-1, भोसरी 2 आणि टेल्को अति उच्च दाब उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा करण्यात येत आहे.

* योजनांची कामे प्रगतीपथावर!
विविध योजने अंतर्गत पूर्ण झालेल्या कामामुळे वीज हानी कमी होऊन वीज ग्राहकांना सुरळीत व योग्य दाबाने वीज पुरवठा करणे, तसेच नवीन येणा-यांना वीज पुरवठा देणे शक्य झाले आहे. डीपीडीसी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे अजून वीज गळती कमी होऊन योग्य दाबाने वीजपुरवठा करणे. नवीन मागणी असलेल्या वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.