पुणे । महावितरणच्या वतीने राज्यभरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी सातत्याने नवनवीन उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणच्या वीजबिलावरील ग्राहकाच्या पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्या वतीने अधिकृत मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत असून त्याद्वारे ग्राहकांना आपल्या पत्त्याची दुरुस्ती करता येणार आहे. मागील दोन दिवसांत राज्यातील सुमारे 52 हजार ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून इतरांनीही याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
उपकेंद्रांची क्षमता वाढविणे
राज्यातील जुन्या वीजयंत्रणेला संजीवनी देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी जुन्या वीजवाहिन्या बदलून नव्याने टाकणे, ट्रान्सफार्मर बदलणे अथवा त्यांची क्षमता वाढविणे, उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, ओव्हरहेड वीजवाहिन्या भूमीगत करणे यावर भर देण्यात आला. विशेष म्हणजे अल्पावधीतच या कामांची पूर्तता करण्यात आली.
थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न
थकबाकीदार शासकीय कार्यालयांनी थकबाकी भरावी यासाठी या कार्यालयांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याशिवाय त्यांना स्मरणपत्रेही पाठविण्यात आली आहेत. त्यानुसार काही कार्यालयांनी प्रतिसाद देऊन थकबाकी भरली आहे. मात्र, काही कार्यालयांकडे अद्यापही थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
ग्राहकाचा पत्ता उपलब्ध असणार
महावितरणच्या ज्या ग्राहकांनी आपला अधिकृत मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविला आहे. अशा ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत आहे. या यावरील लिंक ओपन केल्यास त्यावर ग्राहकाचा पत्ता उपलब्ध असणार आहे. त्या पत्त्यात दुरुस्ती करण्याची सुविधा लिंकद्वारे देण्यात आली आहे.
योग्य वेळेत रिडिंग करणे
वीजबिलावरील पत्त्याची दुरुस्ती झाल्यामुळे ग्राहकांना वेळेत बिल मिळणे, योग्य वेळेत रिडिंग करणे या प्रक्रियेत अधिक अचूकता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनाही वेळेत वीजबिल भरुन महावितरणच्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. राज्यात महावितरणचे सुमारे 2 कोटी 50 लाखापेक्षा अधिक ग्राहक आहेत. त्यापैकी 1 कोटी 95 लाख ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईलची नोंदणी महावितरणकडे केली आहे. मोबाईलवरील एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी असेही आवाहन महावितरणने केले आहे.
खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळच नाही
घटत चाललेला महसूल याची महावितरण प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. खर्चाचा आणि मिळत असलेल्या उत्पन्नाचा ताळमेळच बसत नसल्याने प्रशासनाने राज्यभर महसूल वसुलीची मोहिम सुरू केली असून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे घरगुती, व्यावसायिक ग्राहकांसोबत शासकीय थकबाकीदारांचाही वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश मुख्य कार्यालयाने सर्व परिमंडलांना दिले आहेत. त्यानुसार दोन दिवसांत या मोहिमेला प्रारंभ होणार आहे.