बारामती । महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ’मेकअप 1986’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. तर भांडूप परिमंडलाचे ’नजरकैद’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. महावितरणमधील कर्मचार्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या नाट्यस्पर्धेचा समारोप कविवर्य मोरोपंत नाट्यमंदिरात गुरुवारी झाला.
महावितरण पुणेचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, कल्याणचे प्रादेशिक संचालक सतीश करपे, नागपूरचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागनाथ इरवाडकर यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर परीक्षक कमल हावळे, राज काझी, हेमंत एदलाबादकर तसेच प्रभारी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील, अनिल कांबळे उपस्थित होते.
नाट्यस्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिकांचेही वाटप करण्यात आले. दिग्दर्शनासाठी हेमंत नगरकर, डॉ. संदीप वंजारी, अभिनय (पुरुष) डॉ. संदीप वंजारी, संतोष गहेरवार, अभिनय (स्त्री) अपर्णा माणकीकर, दीप्ती थोरात, नेपथ्य राजीव पुणेकर, संजय राऊळ, प्रकाशयोजना सारिका सातपुते, राजेश पंडित, संगीत संजय राऊळ, महेंद्र चुनारकर, विकास निकम, रंगभूषा सचिन गुरव, सुप्रिया पुंडले, शैलजा सानप, उत्तेजनार्थ अभिनयासाठी अभय अंजीकर, वर्षा इदुलापल्ली, विवेक शेळके, लक्ष्मण वारकरी यांनी पुरस्कार मिळवला. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी या नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या चारही नाटकांतील कलावंतांचा जिवंत अभिनय, संवादफेक आणि संहितेशी समरूप होणे या बाबींचे कौतुक केले. याप्रसंगी प्रादेशिक संचालक (कल्याण) सतीश करपे, प्रादेशिक संचालक (नागपूर) भालचंद्र खंडाईत, परीक्षक राज काझी, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी पी.एस. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
नाट्यातून नात्यांचा वेध
पुणे परिमंडलाने श्रीरंग गोडबोले लिखित व हेमंत नगरकर दिग्दर्शित ’मेकअप 1986’ हे नाटक सादर केले. मानवी नात्यांचा उत्कंठावर्धक नाट्यातून वेध घेणार्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी लातूर परिमंडळाने ’रातमतरा’ तर भांडूप परिमंडळाने ’नजरकैद’ नाटक सादर केले.