नवी मुंबई । महावितरणच्या वाशी मंडळाअंतर्गत येणार्या नेरुळ विभागातील कर्मचार्यांकरिता मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर नुकतेच संपन्न झाले. लायन्स क्लब, नवी मुंबई व अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले. या शिबिराचा लाभ नेरूळ विभागाअंतर्गत असलेल्या नेरुळ, पामबीच, सीबीडी या तीनही उपविभागातील 150 हून अधिक अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी घेतला. तसेच नेरूळ विभागात पार पडलेल्या या आरोग्य शिबिरात 20 कर्मचार्यांनी रक्तदान केले. या वेळी अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने कर्मचार्यांची तपासणी करून आवश्यक त्या आरोग्यविषयक सूचना केल्या. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांना तणावरहीत जीवन व निरोगी आयुष्य यावर मार्गदर्शन केले.
नेरुळ विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धराज किन्नूर यांनी पुढाकार घेऊन शिबीर यशस्वी करणार्या लायन्स क्लब, नवी मुंबईच्या अध्यक्षा अनुराधा करपे यांचे आभार मानले. या वेळी अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. अश्विनी पिंपळे, डॉ.अनुराधा व त्यांच्या टीमने कर्मचार्यांची तपासणी केली. या कार्यक्रमास महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे संचालक सतीश करपे व लायन्स क्लबच्या उषा तलवार व प्रताप मुदलियार यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी मुकेश तनेजा, उज्ज्वला खोबरेकर, नेरुळ उपविभागाच्या अति. कार्यकारी अभियंता अस्मिता पाटील, पामबीच उपविभागाचे अति. कार्यकारी अभियंता सोपानराव पवार तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.