महावितरणच्या कामचुकार अधिकार्‍यांची गय करणार नाही

0

शिरूर । महावितरण तसेच अधिकार्‍यांच्या तक्रारींचा पाढाच शिरूरवासीयांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर शुक्रवारी मांडला. महावितरण व विजेच्या तक्रारी संदर्भात त्यांनी आढावा बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कामचुकार अधिकार्‍यांची गय केली जाणार नसल्याचा दम देत कर्मचार्‍यांना फैलावर घेतले.

बडतर्फीची कारवाई
या बैठकीत विजेच्या स्वयंपूर्णतेसाठी सौरऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. वीज कंपनीच्या वायरमन व अधिकार्‍यांनी कामाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असून त्या ठिकाणी न राहिल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

गावातील तरुणांना संधी
शिरूर तालुक्यातील शाळांना सरकारकडून योजनेद्वारा सौरऊर्जा पुरविण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. प्रत्येक गावात आयटीआय इलेक्ट्रिकल झालेला तरुण शोधून त्या तरुणाला ऊर्जा विभागासाठी प्रशिक्षित केले जाणार आहे. अशा तरुणांची मदत गावातील विजेसंदर्भातील तक्रारी सोडविण्यासाठी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोडशेडींगचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी
अचूक बिलांसाठी शासनस्तरावर मोबाईल अ‍ॅप विकसित केले असून त्याचे लवकरच लाँचिंग केले जाणार असणार असल्याचीही माहिती बावनकुळे यांनी दिली. माजी ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परिसरातील लोडशेडींगचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ऊर्जामंत्र्यांकडे केली.

तक्रारींचा पाढा
आमदार बाबूराव पाचर्णे यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. तसेच शेतीपंपाच्या वीजेच्या प्रश्नांबाबत माजी आमदार पोपटराव गावडे यांनी ऊर्जामंत्र्यांचे लक्ष वेधले. अशा अनेक तक्रारींचा पाढा यावेळी ऊर्जामंत्र्यांसमोर वाचण्यात आला. शिरूर तालुक्यात ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत प्रथमच झालेल्या या आढावा बैठकीस प्रादेशिक संचालक संजय टांकसाळे, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पवार, पंचायत समिती सभापती सुभाष उमाप, तहसिलदार रणजित भोसले, महावितरणचे मुख्य अभियंता संजय नाळे आदी उपस्थित होते.