महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मनस्ताप

0

डोळखांब । गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वीजग्राहकांना चुकीचे रिडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहापूरमध्ये महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेले ग्राहक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा रकमेची वीजबिले येत आहेत. अनेक ग्राहकांनी भरमसाट वीजबिल येत असल्याबद्दल तक्रारीही केल्या. मात्र, त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. काहींना तर ही बिले भरावीच लागली. वीजग्राहकांना चुकीचे रिडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले, जलदगतीचे वीज मीटर या समस्यांना वीजग्राहकांना सामोरे जावे लागत आहे.

संगणकीकरणामुळेच नुकसान अधिक
रिडिंगचे छायाचित्र काढूनही तालुक्यातील 80 टक्के वीजबिलांवर (रिडिंग नॉट अवेलेबल) असे येत असते. त्यामुळे हे बिल पडलेल्या रिडिंगनुसार आकारण्यात येते की एजन्सीच्या खोट्या अहवालानुसार याबाबतही शंका निर्माण होत असते. वीजबिल रिडिंग घेणार्‍या आणि अवेळी वीज बिले वाटप करणार्‍या एजन्सीबद्दल तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही. संगणकीकरणाने काहीही फायदा झाला नसून, त्याचे उलट नुकसान झाले आहे तसेच सुधारलेले बिल भरले तरी त्याची नोंद नसल्याने पुन्हा दुसर्‍या महिन्यात चुकीचे बिल येत असल्याची माहिती अशोक पडवळ यांनी दिली.

‘भरमसाट बिले कशी?’
गेल्या काही महिन्यांत अनेक वीजग्राहकांना भरमसाट रकमेची वीजबिले देण्यात आली होती. सदोष वीज मीटरमुळे ग्राहकांना ही बिले येतात का? जर असतील तर महावितरण काय झोपा काढते का? असा सवाल संतप्त ग्राहक करत आहेत. चुकून वीजबिल वाढीव येणार्‍यांनी कार्यालयात संपर्क करावा, असा फुकटचा सल्ला उपअभियंता काटकवार देत असतात. पण हे नेहमीचे रडगाणे असल्याने हातातील कामे टाकून दर महिन्याला या कार्यालयात वीजबिल घेऊन जावे लागले तर मग कंत्राटदाराच काय काम, असा संतप्त सवाल अनेक ग्राहक करत असतात.

कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा
कंत्राटदारामध्ये ऐनवेळी केलेला बदल आणि संबंधित कंत्राटदाराचा गलथान कारभार यामुळेच वीजबिलामध्ये मोठा घोळ झाल्याचेही अशोक पडवळ या ग्राहकाने सांगितले. 30 दिवसांच्या आत मीटर रिडिंग घेऊन ते तत्काळ यंत्रणेकडे पाठवणे आवश्यक असते. मात्र, महावितरणच्या शहापूर विभागाने नेमलेल्या नवीन कंत्राटदाराच्या बेजबाबदार कारभारामुळे काही वेळेस 30 दिवसांनंतरही रिडिंग यंत्रणेकडे पोहोचू शकत नसल्याने अनेक वेळा दोन महिन्यांचे संयुक्त बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात येते.

अस्पष्ट छायाचित्र
युनिटचा अचूक आकडा दर्शवण्यासाठी मीटरचे छायाचित्र बिलावर प्रसिद्ध केले जाते. मात्र, सध्या येणार्‍या बिलावरील मीटरचे छायाचित्र तितकेसे स्पष्ट नसल्याने आणि बहुतेक वीजबिलांवर मीटरचे छायाचित्रच नसल्याने मीटरची व त्यावरील आकड्यांची ओळख पटत नसल्याने नक्की वीजबिल कोणत्या युनिट दराने आकारला जातो याची माहिती ग्राहकांला होत नाही. कार्यालयातून सुधारित वीजबिल प्राप्त होत असले, तरी ही दुरुस्ती नेमकी कशाप्रकारे केली आहे, हेदेखील ग्राहकांना कळणे आवश्यक आहे.