महावितरणने अघोषीत लोडशेडींग केले रद्द

0

बारामती । इंदापूर तालुक्यातील वालचंदनगरमध्ये महावितरणने अघोषीत लोडशेडींग सुरू केले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यावर दै. जनशक्तिने आवाज उठवला होता. त्याबाबतचे वृत्त दैनिक जनशक्तिने 13 सप्टेंबर 2017 च्या अंकात वालचंदनगरवासियांना महावितरणचा झटका या मथळ्याखाली छापून आणले होते. यामुळे महावितरणचे धाबे दणाणले आहेत. या वृत्ताची गंभीर दखल घेत महावितरणने वालचंदनगर बाजारपेठेतील लोडशेडिंग रद्द केले आहे. आता दुकानदारांना सुरळीत वीजपुरवठा होऊ लागल्याने ते समाधान व्यक्त करीत आहेत.

थकबाकी वाढल्याने लोडशेडींग
वालचंदनगर येथील महावितरण कार्यालयाने अघोषितपणे लोडशेडींग सुरू केले होते. वालचंदनगर परिसरात व इंदापूर तालुक्यात सरासरीपेक्षा 40 टक्के पाऊस जास्त झाला आहे. त्यामुळे सध्या शेतीचे वीजपंप बंद आहेत. त्यामुळे 70 ते 80 टक्के वीजेचा वापर कमी झालेला आहे. असे असतानादेखिल बाजारपेठेतील ग्राहकांवर भारनियमन लादले जात होते. या भारनियमनासाठी महावितरणचे अधिकारी थकबाकीचे कारण पुढे करत होते. वसुली कमी झाल्याचे लपविण्यासाठी अधिकार्‍यांनी भारनियमन सुरू केले होते. ते नागरिकांनी उघडकीस आणल्यामुळे महावितरणला माघार घ्यावी लागली.

दै. जनशक्तिने फोडली अन्यायाला वाचा
अघोषीत भारनियमनामुळे लहान मुले, वयोवृध्द माणसे तसेच आजारी रुग्ण यांना चांगलाच त्रास होत होता. विशेष म्हणजे 12 ते 14 तास भारनियमन करून महावितरण नागरिकांना त्रासच देण्याचे काम करीत होते. गावोगावच्या पाणीपुरवठा योजना या भारनियमनामुळे अडचणीत आल्या होत्या. भारतीय जनता पार्टीने महावितरणचे अधिकारी सरकारलाच जाणीवपूर्वक बदनाम करीत आहेत, असा आरोप केला आहे. याची गंभीर दखल घेऊन भाजपने अांदोलन करण्याचा इशाराही दिला होता. दैनिक जनशक्तिने या अन्यायाला वाचा फोडली. त्यामुळेच महावितरणने भारनियमन रद्द करून वीजपुरवठा सुरळीत केला आहे.