महावितरणने केले गणेशभक्तांचे प्रबोधन

0

बारामती । महावितरणने सुरू केलेल्या ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात 25 लाखांहून अधिक ग्राहक वीजबिल ऑनलाईन भरत आहेत. या सुविधेचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा, यासाठी महावितरणने शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन याबाबत भाविकांचे प्रबोधन केले.

महावितरणचे उपविभागीय अभियंता प्रकाश देवकाते, शाखा अभियंते डी. एस. जगदाळे, सुनील गौंड, सुनील महाडीक, सुनील राख, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्‍वर आर्दड व कर्मचार्‍यांनी विविध गणेश मंडळांना भेट दिली. यावेळी ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. ऑनलाईन पेमेंटची माहिती देणारी पत्रके ठिकठिकाणी वितरीत करण्यात आली.

श्री काशिविश्‍वेश्‍वर तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कसबा गणेश महोत्सवात नगरसेवक सूरज सातव यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांचे स्वागत केले. त्यांनी ऑनलाईन पेमेंट सुविधा उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करून गणेश महोत्सवात येणार्‍या सर्व भाविकांपर्यंत या सुविधेची माहिती पोचविण्याची ग्वाही दिली. वीजग्राहकांचा वेळ व रांगेत उभे राहण्याचे श्रम वाचावेत, यासाठी महावितरणने ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांनी यावेळी केले. तसेच गणेशोत्सवात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे सर्व कर्मचारी तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले.