मुंबई । ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी हवी आहे अशा इच्छुक ग्राहकांसाठी ’कनेक्शन ऑन कॉल सेवा’ महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे.
नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी तसेच ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात एप्रिल 2017 पासून विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचा आतापर्यन्त सुमारे 792 ग्राहकांनी लाभ घेतला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघून या विशेषकक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. नवीन वीजजोडणी हवी असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकाने मुख्यालयातील मदत कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर त्या कक्षातील कर्मचारी या ग्राहकाची सविस्तर माहिती घेतील.