जळगाव । औद्यागिक वसाहत येथील महावितरण कंपनीतील शिपायाचा बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. जितेंद्र लक्ष्मण पाटील (45 रा. शंकरअप्पानगर, पिंप्राळा) असे मयताचे नाव आहे. मात्र, मृत्यूनंतर नोंदीसाठी नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी रामानंदनगर, जिल्हापेठ तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वारी करण्याची वेळ आली़ पोलिसांनी हद्दीचा वाद निर्माण केल्याने तब्बल दोन तासानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली़
कार्यालयात सफाई करातांना झाल्या उलट्या
जितेंद्र पाटील हे सकाळी 9 वाजेच्या नेहमीप्रमाणे एमआयडीसीतील महावितरण कंपनीच्या कार्यालयात गेले. साफसफाईचे काम केले यानंतर त्यांना दुपारी 11.30 वाजता उलटी झाली. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना भास्कर मार्केट परिसरातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. दुपारी त्यांच्या मृत्यूच्या नोंदीसाठी नातेवाईकांसह त्यांच्या परिसरातील नागरिकांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी त्यांना एमआयडीसी परिसरात ड्युटीवर असताना घटना घडल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. एमआयडीसी ठाण्यात पोहचल्यावर ते पिंप्राळा येथील रहिवासी असल्याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला तेथील पोलिसांनी दिला.रामानंदनगर येथे पोहचल्यावर कर्मचाजयांनी जिल्हापेठ हद्दीतील खाजगी रूग्णालयात मृत्यू झाल्याने त्या ठिकाणी जाण्यास सांगितले. अशा प्रकारे दोन तास फिराफिर झाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय गाठले. याठिकाणी पोलीस कर्मचाजयांसोबत शाब्दीक चकमक उडाली़ यानंतर दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी अखेर रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.