महावितरण अभियंत्याची बदली रद्द करा

0

भोसरी : महावितरण कंपनीच्या भोसरी विभागीय कार्यालयांतर्गत मोशी शाखेत कार्यरत असलेले अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश श्रीगड्डेवार यांची मुदतीपूर्वीच करण्यात आलेली बदली तडकाफडकी रद्द करावी, अशी मागणी शहरातील लोकप्रतिनिधींनी केली आहे. या अभियंत्याच्या प्रामाणिक कामकाजामुळे नागरिकांना न्याय मिळत असल्याने जनतेचा कौल लक्षात घेऊन ही मागणी रद्द करण्यासाठी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.

प्रामाणिक अधिकार्‍यावर अन्याय
भोसरी विभागीय कार्यालयांतर्गत मोशी शाखा कार्यालय आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक गृहप्रकल्प या परिसरात उभारले आहेत. त्यामुळे या परिसरातील विजेची मागणी वाढली असून, या परिसरातील सुमारे 2200 ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. याच कार्यालयात कार्यरत असलेल्या अन्य एका अधिकार्‍याच्या कार्यशैलीबाबत महावितरण परिमंडळ कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेदेखील त्या अधिकार्‍याच्या गैरकारभाराची पुराव्यासह तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत, महावितरण प्रशासनाने त्यांची बदली वडगाव मावळ विभागात केली होती. मात्र, ही बदली दोन दिवसांत महावितरण प्रशासनाने रद्द करत, त्यांना मोशी शाखा कार्यालयात पुन्हा रुजू होण्याचा आदेश दिला. दुसरीकडे प्रामाणिक अधिकार्‍याची विनाकारण बदली केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

वीजजोड रखडल्याचे कारण
या परिसरातील वीजजोड रखडल्याचे खापर अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश श्रीगड्डेवार यांच्यावर फोडत त्यांची तडकाफडकी मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. या अनपेक्षित बदलीने प्रामाणिक अधिकार्‍यांना काम करणे अवघड होईल. तसेच महावितरण प्रशासनाकडे पाहण्याचा सर्वसामान्य नागरिक व वीज ग्राहकांचा दृष्टीकोन बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या निवेदनात नमूद केले आहे. आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक दत्ता साने, नगरसेविका मीनल यादव अशा अनेक लोकप्रतिनिधींनी मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांना निवेदन दिले आहे.