महावितरण कंपनीतून वायरींच्या बंडल चोरणार्‍या महिला टोळीचा पर्दाफाश

0

1 लाख 14 हजारचा मुद्देमाल केला होता चोरी ; चार महिलांसह एकाला मुद्देमालासह ताब्यात

जळगाव- शहरातील एमआयडीसी परिसरातील महावितरण कंपनीच्या गाळणी कक्षा आवारातून 1 लाख 14 हजार 876 रुपयांचे जी.आय.वायरचे 132 बंडल लांबविल्याची घटना 18 जुलै रोजी घडली होती. या गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला असून शिवाजीनगरातील चार व गेंदालाल मिलमधील वृध्द अशा पाच जणांच्या टोळीला मुद्देमालासह अटक केली आहे.

एमआयडीसी परिसरातील महावितरण कंपनीच्या गाळणी कक्ष आवारातून जी.आय. वायरचे 160 किलोग्रॅम वजनाचे 132 बंडल असा एकूण 1 लाख 14 हजार 876 रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना 18 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी समोर आली आली होती. याप्रकरणी सहाय्यक अभियंता बापू माधवराव देशमुख वय 30 रा. रणछोड दास नगर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रिक्षासह वायरींचे बंडलचा मुद्देमाल हस्तगत
पोलीस रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी गुन्ह्याचा छडा लावला. त्यानुसार पोलिसांनी संशयित सीमा मजहर कुरेशी वय 28, शोभा मुकेश पवार (वय 35), रजीया जाकीर शहा (वय 25), भुरी नबा पटेल (वय 31) सर्व रा. लक्ष्मीनगर, शिवाजीनगर व मोहम्मदअली अभेदअली (वय 56, रा. गेंदालाल मिल) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. रिक्षातून त्यांनी वायरीचे बंडल वाहून नेले होते. त्यानुसार पोलिसांनी 1200 किलोग्रॅम वजनाचे 63 हजार 900 रुपये किमतीचे 108 वायरीचे बंडल व 60 हजार रुपये किमतीची एम.एच.19 व्ही.0318 क्रमांकाची प्रवासी वाहतूक रिक्षा असा एकूण 1 लाख 23 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता. संशयितांना शुक्रवारी न्या. अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच न्यायालयाच्या आदेशाने महावितरण कंपनीला माल परत करण्यात आला आहे. माल हस्तगत झाल्याने न्यायालयाच्या आदेशाने संशयितांची सुटका करण्यात आली.