मुरुड । ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर विद्युतबाबतच्या सुविधा तातडीने उपलब्ध होण्यासाठी काही सेवा या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी एक गाव एक विद्युत व्यवस्थापक योजना अमलात आणण्यासाठीचा महत्त्वाचा निर्णय महावितरण विभागाने घेतला आहे. यामुळे मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायत हद्दीतील आयटीआयधारक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सतत होणारा खंडित विद्युतपुरवठ्याचा खेळखंडोबा थांबण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत कर्मचारी नियुक्ती असलेल्या गावात राहत नसल्याने नेहमी विजेचा खेळखडोबा सुरू असतो. अनेक तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसहित छोट्या दुकानदाराचे अतोनात नुकसान होत असते.
विद्युतसेवक यास प्रती ग्राहक नऊ रुपये मानधन
राज्य शासनाने ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत एक विद्युतसेवक करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्युत सेवक म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील विजतंत्री आयटीआय झालेला किंवा गावात विद्युतसंबंधी कामे करणार्या व्यक्तीस विद्युतसेवक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. ग्राम विद्युत सेवक यास प्रती ग्राहक नऊ रुपयेप्रमाणे प्राप्त होणारे उत्पन्न किंवा तीन हजार रुपये यापैकी जे काही अधिक असेल ते महावितरण विभागाकडून अदा करण्यात येणार आहे.
ज्या ग्रामपंचायत हद्दीत विद्युतग्राहकांची संख्या ही तीन हजारांपेक्षा कमी आहे त्या ग्रामपंचायत हद्दीत विद्युत सेवक नियुक्त करण्यात येणार आहे.
-सचिन येरेकर, उपअभियंता मुरुड.